लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुतीतल्या पक्षांमध्ये अनेक दिवस रस्सीखेच चालू होती. महायुतीने आतापर्यंत जवळपास राज्यातल्या ४५ हून अधिक जागांबाबतचा अंतिम निर्णय घेतला असला तरी अनेक जागांवरून महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्यानंतर महायुती टिकेल का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत, यादरम्यान महायुती टिकून राहावी अशी प्रार्थना शेळके यांनी केली आहे. तसेच महायुतीकडून श्रीरंग बारणेंचा प्रचार योग्यरित्या चालू आहे का? असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.
सुनील शेळके म्हणाले, या महिन्यानंतर काय होईल ते माहिती नाही. महायुती टिकावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. एक महिन्यानंतर सगळी मंडळी कशी पटापटा पळतील त्याचा मी विचार करतोय. ही माणसं मला सापडतच नव्हती. गेली चार-साडेचार वर्षे मला बघितलं की पळायची, मला बघितलं की इकडे-तिकडे बघायची. आज सगळे सापडले. त्यामुळे माझा उर भरून आलाय. त्यामुळे सगळ्यांना मिठ्या मारायला पाहिजेत.
आमदार सुनील शेळके यांनी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि भाजपाच्या पुणे ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनादेखील इशारा दिला आहे. शेळके म्हणाले, गणेश भेगडे… तू गळ्यात पडायच्या आधी तुला कसं ढकलायचं याचा विचार आम्ही करतोय. तुम्हालाही माहिती नसेल तुमच्या खाली मीसुद्धा सुरूंग लावून बसलो आहोत.
हे ही वाचा >> “आता तुमचं भविष्य…”, एकनाथ खडसेंचं नाव न घेता गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “मी आहे म्हणून…”
सुनील शेळके म्हणाले, कुठल्या मुहुर्तावर मी आमदार झालो हेच मला कळेना. मला मुहूर्त सांगितला होता, त्या मुहुर्तावर मी निवडणुकीचा अर्ज भरून आलो. त्यानंतर पाच वर्षांच्या आत असं सर्वकाही चित्र मी पाहिलं आहे, असे काही अनुभव मी घेतलेत की पुढच्या २५ वर्षांत जो कोणी आमदार असेल त्याला असं चित्र पाहायची वेळ येणार नाही.