शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट केले जातील असा आरोप करुन महाड या ठिकाणी जितेंद्र आव्हाड महाडच्या चवदार तळ्यावर आंदोलन केलं. मनुस्मृती फाडताना त्यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होतो आहे. भाजपाने या कृतीविरोधात राज्यभरात आंदोलन केलं आहे. या सगळ्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस वाराणसी दौऱ्यावर

देवेंद्र फडणवीस वाराणसी दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशातल्या सातव्या आणि अंतिम टप्प्याच्या प्रचारासाठी ते पोहचले आहेत. काशी या ठिकाणी काशी-महाराष्ट्र समागम कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील पुणे अपघात आणि मनुस्मृती व जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावरही भाष्य केले. “आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मी काशीत प्रचाराला आलेलो नाही मी लोकांचं प्रेम पाहण्यास आलो आहे असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींना मुंगेरीलालची स्वप्न पाहुद्या..

राहुल गांधी म्हणतात की ४ जूनला मोदी सरकार घरी जाणार आणि इंडिया आघाडीचं सरकार येणार, याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी लहान असताना मुंगेरीलाल के हसीन सपने ही सीरियल लागायची. त्यात दाखवल्याप्रमाणे राहुल गांधींना स्वप्न पाहु द्या. ते भारताचे काय अमेरिकेचेही राष्ट्राध्यक्ष होतील अशी स्वप्नं त्यांना पडत असतील. लोकांनी मोदींना निवडलं आहे हे आम्ही पाहतो आहोत.”

हे पण वाचा- Mahayuti Andolan: राज्यभरात महायुतीकडून जितेंद्र आव्हाडांविरोधात निषेध आंदोलन

मनुस्मृतीतले श्लोक अभ्यासक्रमात येणार का?

मनुस्मृतीतला एकही श्लोक कुठल्याही अभ्यासक्रमात घेण्याचा विचारही महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात आलेला नाही. आजच नाही कधीही आलेला नाही. त्यासंदर्भात कुठलीही चर्चा नाही. त्यामुळे तो काही प्रश्नच नाही. आमचे विरोधक रोज खोटं बोलतात आणि त्यासाठी मुद्दा शोधून काढतात. ज्यांनी चर्चा सुरु केली त्यांनीच आंदोलन सुरु केलं. ते आंदोलन कसं खोटं होतं हे आपण पाहिलं. आंदोलन करताना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांनी (जितेंद्र आव्हाड) फाडला. महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनादरम्यान जी कृती केली त्यावरुन भाजपा आक्रमक झाली आहे. राज्यभरात आंदोलन करण्यात येतं आहे. या आंदोलनात जितेंद्र आव्हाडांचा फोटो फाडला जातो आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी आव्हाड यांची बाजू मांडली. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही देखील आव्हाड यांची पाठराखण केली. तर, जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या घटनेबाबत माफी मागितली आहे. “काल अनावधानाने झालेल्या प्रसंगा बद्दल मी लगेच जाहीर माफी मागितली.” असं आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.