अहिल्यानगर : नगर शहरातील श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाची जागा व तेथील मंदिर विकण्याचा घाट हाणून पाडू असा इशारा देतानाच माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी धर्मदाय आयुक्तांनी या संस्थेवर प्रशासक नियुक्त करावा, अशी मागणी आज, गुरूवारी पत्रकार परिषदेमध्ये केली.
काही ट्रस्टींनी चुकीच्या पद्धतीने कारभार करत ही जागा विक्रीला काढल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी खासदार नीलेश लंके, शिवसेनेचे (ठाकरे गट) शहरप्रमुख किरण काळे, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, मनोज गुंदेचा, विकेश गुंदेचा, महावीर मुथा, योगीराज गाडे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांची भेट शिष्टमंडळाने घेत मंदिराच्या जागेतील अतिक्रमण करून केलेले बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा तक्रार अर्ज काळे यांनी दिला. धंगेकर म्हणाले की, “जैन मंदिराची ही जागा गेल्या ७०-८० वर्षांपूर्वी महापालिकेच्या नोंदीमध्ये मंदिर म्हणून नोंदवलेली आहे. मूळतः ही जागा जैन समाजाला देताना ती विकू नये असे स्पष्टपणे कागदपत्रांत नमूद आहे. मात्र तरीही विश्वस्तांनी धर्मदाय आयुक्तांची कोणतीही परवानगी न घेता जाहीर नोटीस प्रसिद्ध करून जागा विक्रीला काढली.
संबंधित विश्वस्तांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा न्यायालयात दाद मागू. संबंधित संस्थेला जागा विकसित करता येत नसेल तर आम्ही निधी मिळून देऊ, विश्वस्त सक्षम असतील तर पुढील पिढीच्या हाती त्यांनी कारभार सोपवावा. समाज पुढे आला नाही तर आम्ही न्यायासाठी दाद मागू. देशभरात अनेक ठिकाणी समाजाच्या जागांचा गैरव्यवहार उघड होत आहे.
खासदार लंके म्हणाले, धर्मस्थळाची जागा बळकावण्याचा प्रकार झाल्यास लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. महापालिकेकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत, ही बाब चिंताजनक आहे. संबंधित ट्रस्टींना जागा विकण्याचा अधिकारच नाही.
भगवान महावीर सेना स्थापावी
राज्यभरातील असे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाजाच्या युवकांनी ‘भगवान महावीर सेना’ संघटना स्थापन करावी, असे आवाहनही रवींद्र धंगेकर यांनी केले. जैन समाजाच्या धर्मस्थळांवर कुणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याविरोधात संघटित चळवळ उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
