धाराशिव : उमरगा तालुक्यातील डाळिंब गावाजवळ दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (मंगळवारी) सकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात दोन्ही कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघातात मृत्यू झालेले चौघे कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील रहिवाशी असून जखमी झालेल्या दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बिदर जिल्ह्यातील खाशमपूर येथील रहिवासी असलेले तरुण देवदर्शन केल्यानंतर क्रेटा कारने गावी परतत होते. त्यांची कार डाळिंब गावाजवळून जात असताना बाजूच्या रस्त्यावरून विरुद्ध दिशेने जात असलेल्या कार चालक मनुतजीत हनुमंत मसूती (वय २९, रा. रेल्वे लाईन, सोलापूर) यांच्या कारसमोर एक कुत्रा आडवा आला. त्यामुळे त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले व कार दुभाजकाला धडकून थेट पलिकडच्या रस्त्यावर गेली. त्याचवेळी मसूती यांची कार समोरून येणाऱ्या बिदर जिल्ह्यातील तरुणांच्या कारवर जाऊन धडकली. या धडकेत बिदर जिल्ह्यातील खाशमपूर येथील रहिवासी असलेल्या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. तसेच कार चालक मनुतजीत हनुमंत मसूती हे देखील गंभीर जखमी झाले.
रतिकांत मारुनी बसत्रौंडा (वय ३०), शिवकुमार चितानंद वग्ने (वय २६), संतोष बजरंग बसगोंडा (वय २०), सदानंद माझमी बसगोंडा (वय १९) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. दिगंबर जग्गनाथ सागुलगी (वय ३१) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेन व इतर यंत्रणेच्या सहाय्याने त्यांनी मृतदेह कारमधून बाहेर काढले. तसेच जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उमरगा येथील जिल्हा उप रुग्णालयात आणले आहेत. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार, मुरूम पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी संदीप दहिफळे, पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे, बिट अंमलदार शिंदे, हवालदार वाघमारे, हवालदार महानुरे घटनास्थळी उपस्थित होते.
