शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मोठा बंड करुन राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आणला आहे. शिवसेनेचे ३५ पेक्षा अधिक आमदार एकनाथ शिंदे यांनी फोडले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी बुधवारी सकाळी शिवसेना आमदारांना बैठकीचे पत्र पाठवत हजर न राहिल्यास अपात्रतेच्या कारवाईचा इशारा दिला होता. ते पत्र जाहीर होताच एकनाथ शिंदे यांनी त्यास हरकत घेतली. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सुनील प्रभू यांनी आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश अवैध आहेत, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी भरत गोगावले यांचा प्रतोद पदासाठीचा फॉर्म भरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हीडिओत आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह इतर आमदारांचा संवाद ऐकू येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“प्रतोदाचं काम काय माहित आहे ना? जबाबदारी वाढली तुमची. फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. शिवसेना पक्षाची जबाबदारी तुमच्यावर आहे. सर्व आमदारांनी व्यवस्थित टिकवून ठेवा. त्यांना बोलायला द्या. मागच्या प्रतोदासारखं (सुनील प्रभू) नका करू. मुंबईतल्याच लोकांना जास्त बोलायला द्यायचं. हे आता प्रतोद आहेत. कुणाला पक्षात ठेवायचं, कुणाला काढायचं यांना (भरत गोगावले) अधिकार दिलेले आहेत. सुनील प्रभूपासून सुरुवात करणार आहेत,” असा संवाद या हॉटेलच्या रुममध्ये ऐकायला मिळत आहे.

उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल; नेमकं कारण आलं समोर

आघाडीतून बाहेर पडण्यावर शिंदे ठाम

दरम्यान,शिवसेना आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक महाविकास आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असून, महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे, असे आवाहन बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांना केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे दिलेला मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव शिंदे यांनी फेटाळला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे बोलताना बंडखोर आमदारांना समोरासमोर येऊन बोलण्याचे आवाहन केले होते. तसेच शिंदे यांना अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव देऊन बघावा, अशी चर्चा झाली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dialogue goes viral in eknath shinde hotel room abn