लोकांनी संभाजी भिडे गुरूजींबाबत तोंड सांभाळून बोलावे. आपण कोणाबद्दल आणि काय बोलत आहोत, याचे भान राहून द्यावे, असे सांगत खासदार उदयनराजे यांनी शुक्रवारी भीमा कोरेगाव हिंसाचारासाठी चिथावणी दिल्याचा ठपका असणारे शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांची पाठराखण केली. भिडे गुरुजी वडीलधारी व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. भिडे गुरुजींविरोधात बोलायची कोणाचीही लायकी नाही, असे सांगत त्यांनी आरोप करणाऱ्यांचा समाचार घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव येथील हिंसाचारासाठी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी चिथावणी दिल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांच्यावर याकुब मेमनप्रमाणे ३०२ चा गुन्हा लावून कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही संभाजी भिडे यांच्यावर दोषारोप केले होते. या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी भिडे गुरूजींची पाठराखण केली. त्यांनी म्हटले की, जितेंद्र आव्हाड माझे चांगले मित्र आहेत. मात्र, त्यांनी आपण कोणाबद्दल आणि काय बोलत आहोत, याचा विचार केला पाहिजे. भीमा कोरेगावची घटना घडली तेव्हा भिडे गुरूजी होते किंवा नव्हते हे बघायला तिथे कोणी होतं का? त्यावेळी नेमकं काय आणि कसं घडलं याचा विचार कोणीतरी केला आहे का?, असा सवाल उदयनराजे यांनी केला.

मी या घटनेनंतर भीडे गुरूजींशी बोललो. त्यांनी या प्रकरणाशी माझा काही संबंध नसल्याचे सांगितले. आम्ही फक्त तेथील संभाजी महाराजांच्या समाधीची देखभाल करायचो. यापूर्वी त्याठिकाणी कचरा डेपो होणार होता. आम्ही तो प्रकल्प हाणून पाडला. तेव्हा इतर कोणीही पुढे आले नाही. मात्र, आता निवडणुका लागल्यानंतर या सगळ्याचं राजकारण व्हायला सुरूवात झालेय. गुरूजी याबाबत माझ्याशी बोलताना खूप भावनिक झाले होते. माझ्या आयुष्याची आता कितीशी वर्ष राहिली आहेत आणि आता माझ्यावर असे आरोप होत आहेत, हे दु:ख त्यांनी बोलून दाखवले. मी त्यांना रडू नका सांगितले. आयुष्यात मी त्यांच्यासारखा माणूस पाहिला नाही. त्यामुळे आता त्यांच्याबाबत उद्रेक होईल, असं काहीही वक्तव्य करू नका, असा इशारा उदयनराजे यांनी दिला. ज्यांनी भिडे गुरूजींवर आरोप केले आहेत त्या सर्वांना मी कुठल्याही व्यासपीठावर येऊन उत्तर द्यायला तयार आहे, असेही त्यांनी म्हटले. या सगळ्या घडामोडींमुळे शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे नुकसान झाले आहे. शहरी लोकांना त्याची जाणीव नाही. यामुळे भविष्यात शहरी विरुद्ध ग्रामीण असा वाद पेटू नये, अशी भीती उदयनराजे यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont talk rubbish and baseless thing about sambhaji bhide guruji says udyan raje bhosle