अलिबाग : गणेश मूर्तीकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेणमधून यंदा ४५ हजारांहून अधिक गणेशमूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास दुपटीने गणेशमूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती मूर्तिकार संघटनेकडून देण्यात आली. विशेष म्हणजे यंदा अमेरिका, कॅनडा, थायलंडमधून पेणच्या गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे.
गेल्या वर्षी जवळपास २६ हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या होत्या. यावर्षी ही संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पेणच्या गणपतींच्या मूर्तीना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशातून मागणी होत असते. पेण तालुक्यात गणेशमूर्ती बनवणाऱ्या ५०० लहान-मोठ्या कार्यशाळा आहेत. यातून दरवर्षी साधारण ३२ लाख गणेशमूर्ती बनवल्या जातात. त्यातून जवळपास १०० कोटींची उलाढाल होत असते.
यंदा पेणमधून ४५ हजारांहून अधिक गणेशमूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने अमेरिका, इंग्लड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, मॉरिशियस, थायलंड, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचा समावेश आहे. मार्च महिन्यापासून या गणेशमूर्ती परदेशात टप्प्याटप्प्याने पाठवण्यात आल्या आहेत. अमेरिका, कॅनडा आणि थायलंड या देशांमधून मूर्तींची मागणी वाढल्याने निर्यातीत वाढ झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
जगभरात ज्या देशात अनिवासी भारतीय वास्तव्य करतात, त्या देशातून गणेशमूर्तींची मागणी केली जाते. मागणीनुसार मूर्तिकार या गणेशमूर्ती परदेशात पाठवत असतात. दरवर्षी निर्यात होणाऱ्या गणेशमूर्तींची संख्या वाढत आहे. – श्रीकांत देवधर, अध्यक्ष, पेण गणेश मूर्तिकार संघटना
यंदा १८ हजार गणेशमूर्ती आमच्या कार्यशाळेतून परदेशात पाठवण्यात आल्या आहेत. अमेरिका, कॅनडा, थायलंड या देशांमधून यंदा गणेशमूर्तींच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. – निलेश समेळ, मूर्तिकार, पेण