कराड : सामाजिक विषमतेच्या झळा सोसत, प्रतिकूलतेवर मात करून साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी शोषित, पीडित व कष्टकऱ्यांच्या वेदना आपल्या साहित्यातून मांडल्या. अशा स्फूर्तिदीप व्यक्तिमत्वाच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने मानवतेचा ध्वज उंचावण्यासाठी नवीन ऊर्जा मिळाल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेवक, पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी काढले. समाजाने अण्णा भाऊ साठेंच्या विचारांचा जागर अखंड ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीतर्फे हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा ॲड. संभाजीराव मोहिते यांच्या हस्ते ‘सत्यशोधक अण्णा भाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार’ देवून सन्मान करण्यात आला. त्या वेळी सत्कारास उत्तर देताना, डॉ. आमटे बोलत होते. मानपत्र व सन्मानचिन्ह, रोख रक्कम व फुले पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे निमंत्रक प्रकाश वायदंडे, स्वागताध्यक्ष रामभाऊ दाभाडे, दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे, धनगर महासंघाचे अध्यक्ष प्रवीण काकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, परदुःख जाणून त्यांच्या जीवनात मानवतेचा व न्याय्य हक्काचा आनंद निर्माण करण्यापेक्षा कोणताही धर्म मोठा नाही. झाडेवेली, पशुपक्षी व दीनदुबळ्यांची सेवा करण्याची प्रेरणा बाबा आमटे यांच्याकडून घेतली. त्रिवेणी संगमावर ‘लोकबिरादरी प्रकल्पा’च्या माध्यमातून वननिवासी, आदिवासी, फासेपारधी यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून माणुसकीचे नंदनवन फुलवताना संपूर्ण आयुष्य सफल होत असल्याचा आनंद असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. बाबा आमटे यांच्याप्रमाणे कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता समाजसेवा करा, असे आवाहनही डॉ. आमटे यांनी केले.

आदिवासींचे जीवन पुस्तकातून समजत नाही

आदिवासींचे जीवन केवळ पुस्तकातून समजत नाही, ते प्रत्यक्ष अनुभवावे लागते. आम्ही ते अनुभवले. प्रारंभी काम करताना अनेक अडचणी आल्या. ज्यांच्यासाठी काम करतोय, तेच लोक जवळ येत नव्हते. मात्र, सातत्याने प्रयत्न करून त्यांचा विश्वास संपादन केला. अन् आज या समाजातील अनेक मुले शिकून डॉक्टर, वकील, अभियंते झालेली पाहून समाधान वाटत असल्याचे डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले.