Girish Mahajan on Pranjal Khewalkar Rave Party: राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना कथित रेव्ह पार्टीत सहभाग असल्याबाबत पुण्यातून अटक करण्यात आली आहे. प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात आता आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. हनी ट्रॅपच्या विषयामध्ये एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीका करत आहेत. तसेच मुलगी रोहिणी खडसे याही सरकारवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत, त्यामुळेच त्यांच्या जावयाला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच आमच्याविरोधात असे काहीतरी होईल, याची कल्पना होती, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. यावर आता भाजपा नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना खडसेंवर पलटवार केला आहे. “मी पंढरपूरमध्ये असल्यामुळे मला या प्रकरणाची फारशी माहिती नाही. मी टिव्हीवर पाहिले की, खडसेंचे जावई रेव्ह पार्टीत सापडले आहेत आणि त्यांनीच ही पार्टी आयोजित केल्याचेही बातम्यात दाखवले गेले”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.
तसेच या पार्टीत काही महिलाही उपस्थित असल्याचे बातम्यात दाखवले गेले आहे. आता पाच महिला होत्या की तीन महिला होत्या, याबाबत तपासानंतरच तथ्य कळू शकेल. कुणी पलायन केले का? हे आता सांगणे अवघड आहे. तपासाअंती माहिती समोर येईल, असेही महाजन म्हणाले आहेत.
जावईबापूंना अलर्ट करायला हवं होतं
आमच्यावर अशाप्रकारची काहीतरी कारवाई केली जाईल किंवा ट्रॅप रचला जाईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. या प्रतिक्रियेवर खोचक टीका करताना गिरीश महाजन म्हणाले की, जर खडसेंना ट्रॅप लावला जाणार आहे, याची कल्पना होती तर त्यांनी जावईबापूंना अलर्ट करायला हवे होते.
“मला वाटते खडसेंच्या म्हणण्याला अर्थ नाही. जे झाले ते मान्य केले पाहिजे. तपासानंतर ज्यांची चूक आहे, त्यांना शिक्षा होईल. काही झाले की, म्हणायचे यात षडयंत्र होते. त्यांनी असे केले, यांनी हे केले. मला वाटते, प्रत्येकवेळी आपल्याबरोबरच षडयंत्र कसे काय होते?”, असा सवालही गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.