Video : व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावल्यानंतर आमदार संतोष बांगर यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “तर कायदा…!”

संतोष बांगर यांनी व्यवस्थापकाच्याच कानशिलात लगावली!

Video : व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावल्यानंतर आमदार संतोष बांगर यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “तर कायदा…!”
संतोष बांगर यांनी व्यवस्थापकाच्याच कानशिलात लगावली!

महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या राजकीय भूकंपामध्ये संतोष बांगर हे नाव देखील जोरदार चर्चेत होतं. आधी बंडखोरांवर तोंडसुख घेणारे बांगर नंतर बंडखोर गटाला जाऊन मिळाल्यामुळे त्यांच्यावर शिवसेनेकडून टीका देखील करण्यात येत होती. मात्र, आता एकनाथ शिंदे सरकारमध्ये संतोष बांगर हे सत्ताधारी पक्षाचे आमदार झाले आहेत. त्यामुळे बंडखोर गटाला मिळाल्याची टीका काहीशी ओसरली असली, तरी आता त्यांच्यावर एका नव्या वादामध्ये टीका होऊ लागली आहे. मध्यान्न भोजन योजनेद्वारे कामगारांना निकृष्ट जेवण देणाऱ्या व्यवस्थापकाच्या श्रीमुखात भडकावल्याचा बांगर यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर बांगर यांनी त्यावर खुलासा केला आहे.

नेमकं काय झालं?

हिंगोलीत एका मध्यान्न भोजन केंद्राला संतोष बांगर यांनी १५ ऑगस्ट रोजी भेट दिली. या केंद्रात कामगारांना सरकारी योजनेतून पुरवल्या जाणाऱ्या जेवणाचा निकृष्ट दर्जा पाहून संतोष बांगर यांना संताप अनावर झाला. रागाच्या भरात बांगर यांनी या केंद्राचं काम पाहाणाऱ्या व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. बांगर यांचा हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर सत्ताधारी पक्षात असूनही कायदा हातात घेतल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे. यासंदर्भात आता खुद्द बांगर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

“मला टीकेची पर्वा नाही”

कितीही टीका झाली, तरी आपल्याला त्याची पर्वा नसल्याचं संतोष बांगर म्हणाले आहेत. “माझ्यावर टीका झाली तरी मला त्याची पर्वा नाही. गोरगरीब कामगार सकाळपासून कष्ट करतात. त्यांना जर पोटभर चांगलं जेवण मिळत नसेल, तर असा कायदा हाती घेणं माझ्यासाठी नवीन नाही. अन्यायाविरुद्ध लढा देण्याचं काम मी शिवसेनेकडून करत असतो. ज्या गरीबांनी मला निवडून दिलं, त्यांच्यासाठी जर लढा द्यायचा नाही, तर कुणासाठी द्यायचा? यांना वारंवार सांगून देखील सुधारणा होत नसेल, तर याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता”, असं बांगर म्हणाले आहेत.

कागदावर पक्वान्न, पण प्रत्यक्षात…

दरम्यान, कागदावर कामगारांसाठी मध्यान्न भोजनात पक्वान्न असताना प्रत्यक्षात मात्र करपलेल्या पोळ्या मिळत असल्याचं बांगर म्हणाले. “संबंधित जिल्हाधिकाऱ्यालाही मी याविषयी बोललो. पण तो उडवाउडवीची उत्तरं देत होता. मी विचारलं इथला व्यवस्थापक कोण आहे? तर त्याला काही माहितच नव्हतं. कागदोपत्री चवळी, वाटाणा, गूळ, शेंगदाणा, चपाती, भात असं सगळं म्हटलंय. पण जेवणात दुसरं काहीच नाही. तिथे फक्त भात, डाळ आणि करपलेल्या चपात्या एवढंच आहे”, असं बांगर म्हणाले.

बंडखोर आमदार संतोष बांगर यांना संताप अनावर; व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली, VIDEO व्हायरल

“गरीबांवर अन्याय होत असेल, तर…”

“मला हे काही नवीन नाही. गोरगरीबांवर अन्याय होत असेल, तर मी कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. टीकेची मला पर्वा नाही. फक्त हिंगोलीतच नाही, तर महाराष्ट्रभरात हीच परिस्थिती आहे. हिंगोलीत ४८ हजार डबे दाखवले आहेत. हिंगोलीची लोकसंख्या ७५ हजार आहे. पण त्यांनी कामगारच ४७ हजार दाखवले आहेत. मी विधानसभेत हे प्रश्न उपस्थित करणार आहे. मुख्यमंत्र्यांना भेटूनही याबद्दल सांगणार आहे”, असंही बांगर यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विनायक मेटेंचा अपघात की घातपात? व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर खळबळ, पत्नीने केली चौकशीची मागणी, म्हणाल्या “मलाही…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी