सावंतवाडी: मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली गावात सध्या ‘ओंकार’ नावाच्या हत्तीचा वावर वाढला असून, त्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळत आहे. या हत्तीने काल (शनिवारी) सायंकाळी आणि आज (रविवारी) सकाळी महामार्ग ओलांडला, या दरम्यान दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.
ओंकार हत्ती मूळात दोडामार्ग तालुक्यातून सावंतवाडी तालुक्यात नेतर्डे परिसरात दाखल झाला होता. तेथून त्याने गोवा राज्यात प्रवेश केला आणि पुन्हा फिरून कास, मडुरा, रोणापाल या भागांमध्ये त्याचा वावर वाढला. अखेर, काल शनिवारी संध्याकाळी तो थेट मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली गावात दाखल झाला.
शनिवारी सायंकाळी इन्सुलीच्या भरवस्तीत कुडवतेंब, सावंतटेंब येथून हा हत्ती निघून गेला होता. मात्र, आज रविवारी सकाळी सुमारे ७ वाजता ओंकार पुन्हा महामार्गावर आला. तेरेखोल नदी पात्रात जाण्याचा त्याचा प्रयत्न होता. यावेळी महामार्गावर झालेल्या प्रचंड गर्दीमुळे आणि वाहतुकीमुळे वनविभागाची मोठी दमछाक झाली. अखेर, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा हत्ती तेरेखोल नदी पात्रात उतरून लगतच्या बागायतीमध्ये गेला.
हा दहा ते बारा वर्षांचा ओंकार हत्ती माणसाळल्यासारखा वागत असला तरी, लोकवस्ती आणि शेती-बागायतीमध्ये त्याच्या वाढलेल्या वावरामुळे स्थानिक नागरिक कमालीचे घाबरून गेले आहेत. हत्ती महामार्गावर येत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसांपासून कास, मडुरा, रोणापाल या गावांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या या हत्तीमुळे आता थेट महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली आहे.
वनविभागाची दमछाक
महामार्गावर हत्तीला पाहण्यासाठी जमलेली प्रचंड गर्दी आणि वाहनांची वर्दळ यामुळे वनविभागाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. वनविभागाचे पथक ओंकार हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून असून त्याला सुरक्षित अधिवासात पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
