कराड : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराडशेजारील तासवडे पथकर नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सातारा येथील भरारी पथकाने सापळा रचून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक पकडली. या कारवाईत तब्बल एक कोटी २२ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मोठ्या कारवाईत आकाश चंद्रकांत घोटकुले (२९, रा. उसे, ता. मावळ, जि. पुणे) यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत ही कारवाई करणार्‍या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दिलेली माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तासवडे (ता. कराड) येथील पथकर नाक्यावर आयशर कंपनीचा सहाचाकी ट्रक (क्र. एमएच ४३, बीएक्स ९४०८) थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा राज्य निर्मित रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या तब्बल ४८,९६० बाटल्या (१०२० बॉक्स) आढळून आल्या. आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले हे मोठ्या प्रमाणातील बनावट मद्य जप्त करण्यात आले आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या आकाश घोटकुले याच्याकडून एक भ्रमणध्वनी संचही हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई सापळा रचून करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी कारवाई यशस्वी करण्यात आली आहे. या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजय पाटील, पांडुरंग कुंभार तसेच जवान मनीष माने, विनोद बनसोडे, अरुण जाधव, राणी काळोखे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास निरीक्षक माधव चव्हाण हे करीत आहेत. विशेष म्हणजे गोवा राज्य बनावटीचे बनावट विदेशी मद्य दरवेळी उंब्रज ते तासवडे या दरम्यानच मिळून येते. पकडले जाते. आताही राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा प्रकारचे मद्य तासवडे पथकर नाक्यावर पकडले आहे.

सातारा जिल्ह्यात कुठेही अशा प्रकारचे बेकायदेशीर बनावट मद्य, हातभट्टी दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतूक असा काही प्रकार आढळल्यास अथवा त्याची माहिती मिळाल्यास ही माहिती तातडीने राज्य उत्पादन शुल्क विभागास कळवण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांनी केले आहे.