सांगली : विजयादशमीच्या निमित्ताने गुरुवारची रात्र कवठेएकंद येथील आकाश नयनरम्य प्रकाशकिरणांच्या आतषबाजीने उजळून निघाले. ऑपरेशन सिंदूर, दहशतवाद्यांविरोधातील कारवाई आणि पाकिस्तानचे ड्रोन नेस्तनाबूत करणारे सुदर्शन-२२२ यंत्रणा याचे आकाशातील दारूकामाचे प्रदर्शन पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

विजयादशमीवेळी ग्रामदैवत सिद्धराज म्हणजेच बिर्हाड सिद्ध यांच्या पालखीसमोर शोभेच्या दारूची आताषबाजी करण्याची गेल्या साडेतीन शतकांची परंपरा आहे. दारूकामासाठी गावातील नागरिकच स्वत: दारू तयार करतात. काळ्या रंगाच्या दारूसाठी रूईचा कोळसा, गंधक, सूरमीठ, कानसी भीड आणि पांढऱ्या रंगाच्या दारूसाठी कोळसा, सूरमीठ, गंधक, ॲल्युमिनिअम भीड, फाईन पावडर- ६६६, ९९९, टिटॅनिअम आणि सर्व रंगांसाठी खारचा वापर करण्यात येतो. या पदार्थांचा विशिष्ट परिमाणात वापर करून दारूचे वेगवेगळे प्रकार तयार केले जातात. यातूनच आकाशात सप्तरंगांची उधळण करणारे औटही तयार केले जातात.

रात्री झालेल्या दारूकामामध्ये गोल्डन युवा शक्ती मंडळाने संत बाळूमामांचा नदी प्रवासाचा देखावा सादर केला. ए-वन युवा मंच व ईगल फायर वर्क्सकडून ऑपरेशन सिंदूरवर देखावा सादर झाला. श्रीराम फायरने लढाऊ विमानाच्या प्रतिकृतीतून ऑपरेशन सिंदूर सादर केले. हिंदमाता शहीद भगतसिंग मंडळाने फायर शो व तिरंगा देखावा आकाशात सादर केला.

जमादार मंडळाने अतिरेक्यांना भारतीय सैन्याने कंठस्नान घातल्याचे चित्र प्रदर्शित केले. सिद्धिविनायक मंडळाने दारूकामातून आकाशात डायमंड रिंग तयार केली. विविध दारू शोभा मंडळांनी कागदी शिंगट, अग्नीचा धबधबा, झाडकाम, आकाशात २० फुटांहून अधिक अग्नीच्या ठिणग्या उडवणारी शिंगटे प्रदर्शित केली. गुरुवारी सुरू झालेली शोभेच्या दारूची आतषबाजी शुक्रवारी सकाळी समाप्त झाली.

मंदिरासमोर असलेल्या प्राथमिक शाळेत प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच तासगाव नगरपालिकेची अग्निशामक यंत्रणा तैनात करण्यात आली होती. तसेच रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकही रात्रभर गावात उपस्थित होते. कवठेएकंदलगतच उत्तरेस असलेल्या नागावमध्येही दसऱ्यादिवशी शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली.

या ठिकाणी नागनाथाच्या पालखीसमोर दारूची आतषबाजी करण्यात आली. दरम्यान, सांगली व मिरज शहरात नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या दुर्गामूर्तीच्या विसर्जन मिरवणुका ध्वनिक्षेपकांच्या भिंतीसह वाद्यवृंद व ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात काढण्यात आल्या. मिरवणुकीत पुरुषांच्या बरोबरीने महिलाही सहभागी झाल्या होत्या. मिरजेत श्री अंबाबाई देवीची पालखीतून नगरप्रदक्षिणा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. मिरवणूक मार्ग रांगोळी व फुलांनी सुशोभित करण्यात आला होता. तर मिरवणूक मार्गावर पद्मावती प्रसादम् यांच्या वतीने भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.