राजापूर: मुंबई-गोवा महामार्गांवरील राजापुर तालुक्यातील हातीवले येथील टोल नाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकला महिंद्रा मराझो कंपनीच्या गाडीने जोरदार धडक देवून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी दुुपारी घडली. या अपघातामध्ये राजेश शेखर नायडू (वय ३४ रा. मालाड पश्चिम मुंबई) हे जागीच ठार झाले आहेत. तर, या कार मधील अन्य पाच जण जखमी झाले. या अपघातातील जखमींवर राजापूर रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी कणकवली येथे हलविण्यात आले आल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रा मराझो गाडी (गाडी क्र. एम एच ०२ इ झेड ४७४८) ही मुंबई, मालाड येथून कणकवली, भिरकोन्डकडे येथे नातेवाईकांकडे निघाले होते. महामार्गाने प्रवास करीत असलेल्या या गाडीमध्ये सहा प्रवासी होते. राजापुरातील हातीवले येथील टोल नाक्यावर गाडी आली असता तेथुन पुढे उभ्या असलेल्या ट्रकला (गाडी क्र. एम एच १० ए डब्लू ८१४४) याला मराझो गाडीने मागून जोरात धडक दिली. त्यामध्ये महिंद्रा मराझो गाडीतील राजेश शेखर नायडू यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. तर, जखमी तृशांत सुरेश शेलार (वय ३२ ), कुणाल शिवाजी साळुंखे (वय ३९), हर्षदा कुणाल साळुंखे (वय २८ ), प्रीती राजेश नायडू (वय २६ ), श्राकांत नामदेव घाडगे (वय २८) सर्व रा. मालाड पश्चिम मुंबई या सार्यांना तातडीने राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये
राजेश शेखर नायडू यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर, उर्वरीत सर्व जखमींवर राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी कणकवलीला हलविण्यात आले. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील, उपनिरीक्षक सुधीर उबाळे, मोबीन शेख व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींना सहकार्य करत वाहतुक सुरळीत करुन घटनेचा पंचनामा केला.