रत्नागिरी : लांजा तालुक्यातील कुर्णे (सर्व्हे नं. १९१/१) या राखीव वनक्षेत्रात झालेल्या सागवृक्ष चोरल्या प्रकरणात वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आता पर्यत अकरा संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. यात वापरण्यात आलेली ५ वाहने आणि सागवृक्षाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत जप्त केलेल्या मालाची एकत्रित किंमत सुमारे ८३ लाख रुपये एवढी आहे. ३० ऑगस्ट २०२५ रोजी जंगल फिरतीदरम्यान वनपाल व वनरक्षक, लांजा यांनी कुरणे वनक्षेत्रात सागवृक्षांची सात झाडे अवैधरीत्या तोडण्यात आल्याचे निदर्शनास आणले होते. त्यानंतर नोंदविलेल्या गुन्हा क्र. ८०३/२०२५ च्या तपासात आरोपींचा सहभाग उघडकीस आला होता. दिनांक २४ सप्टेंबर रोजी संशयित आरोपी मनोज संजय पाटणकर, मंदार संजय पाटणकर, मंदार संजय पाटणकर, अजय नागूप्रसाद निषाद, शत्रुघ्न दत्ताराम गोठणकर, विजयकुमार रामशंकर निषाद, मंदार मनमोहन बारस्कर आणि शुभम रवींद्र गुरव (सर्व रा. कुंभवडे) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून क्रेन (एमएच ०९ जीएम ०५५२) आणि ३१ नग (७.४९५ घ.मी.) साग माल जप्त करण्यात आला.
२६ सप्टेंबर रोजी आरोपी संजय शांताराम गुरव (रा. खारेपाटण, ता. कणकवली), श्रेयस गोपाळ बारस्कर, प्रकाश गुणाजी पुजारे, अतुल भाऊ जाधव (सर्व रा. कुंभवडे) यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी आणखी एक क्रेन (एम एच ०८ बीई ४१८५) तसेच बोलेरो पिकअप (एमएच ०८ बीसी २००५) आणि इतर वाहने जप्त करण्यात आली. आरोपी संजय गुरव यांनी पूर्वी कुरणे येथून चोरीचा साग माल ट्रकमध्ये भरून मौजे कुंभवडे येथे उतरवल्याचे कबूल केले. त्यासाठी वापरलेला ट्रक (एम एच ०८ डब्लू ८४२४) राजापूर वनपरिमंडळ कार्यालयात हजर करून जप्त करण्यात आला.
आरोपी मंदार बारस्कर यांनी मजुरांना पोहोचविण्यासाठी वापरलेली बोलेरो पिकअप (एमएच ०८ बीसी २००५) गाडी जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या कारवाईत २ क्रेन, १ ट्रक, २ बोलेरो पिकअप अशी ५ वाहने आणि ५४ नग (३.०२४ घ.मी.) साग माल जप्त झाला आहे. जप्त साग मालाची शासकीय दरानुसार किंमत रु २,१२,०७०/- असून वाहनांची अंदाजे किंमत रु. ८१ लाख आहे. जप्त साहित्य राजापूर वनरक्षकांच्या ताब्यात पावतीवर देण्यात आले आहे. या तपासात विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई (रत्नागिरी), सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियांका लगड, मुख्य वनसंरक्षक गुरुप्रसाद (कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, जितेंद्र गुजले, पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे (लांजा), पोलीस निरीक्षक अमित यादव (राजापूर) तसेच अनेक वनपाल व वनरक्षक सहभागी झाले.