परदेशी कंपन्यांना महाराष्ट्र गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. तसंच त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं आहे. “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेल्या दोन्ही कंपन्या तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात गेल्या आता भारतात येणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करावे,” असंही ते म्हणाले.
“केंद्र सरकारनं १ एप्रिल रोजी देशात इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या गुंतवणुकीकरीता इन्सेंटिव्ह योजनेची सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत अॅपल फोन बनविणाऱ्या तैवानच्या काही कंपन्या भारतात गुंतवणुकीच्या विचारात आहेत. त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे यासंदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे,” अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. त्यांनी ट्विटरवरून याविषयावर भाष्य केलं.
केंद्राने ०१ एप्रिलला इलेक्ट्रॉनिक्स गुंतवणूकीकरीता जाहीर केलेल्या #PLI योजनेअंतर्गत #Apple फोन बनविणाऱ्या तैवानच्या Contract Manufacturing कंपन्या भारतात गुंतवणूकीच्या विचारात आहेत. त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे असे मी @OfficeofUT ला पत्र लिहीले आहे
— Prithviraj Chavan (@prithvrj) July 22, 2020
आणखी वाचा- “शिवसेनेचे मंत्री काँग्रेस आमदारांचा मानसन्मान ठेवत नाहीत, कामाच्या फाईली अडवतात”
“फडणवीस सरकारने फॉक्सकॉन कंपनी पुण्यात ३५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असे जाहीर केले होते. पण ती तामिळनाडू आणि आंध्र मध्ये गेली. विस्ट्रॉन ही कंपनी कर्नाटकात गेली. महाराष्ट्रात अॅपलची एकही कंपनी नाही. आता Pegatron कंपनी भारतात येण्याच्या विचारात आहे. तिला आपल्या राज्यांत आणले पाहिजे,” असंही ते म्हणाले.
फडणवीस सरकारने #Foxconn कंपनी पुण्याला ३५,००० कोटीची गुंतवणूक करणार असे जाहीर केले होते, पण ती तामीळनाडू व आंध्र मध्ये गेली. #Wistron कंपनी कर्नाटकात गेली. महाराष्ट्रात #Apple ची एकही कंपनी नाही. आता #Pegatron कंपनी भारतात येण्याच्या विचारात आहे. तिला आपल्या राज्यांत आणले पाहीजे.
— Prithviraj Chavan (@prithvrj) July 22, 2020
फॉक्सकॉनची भारतात गुंतवणुकीची योजना
आयफोनची निर्मिती करणारी प्रसिद्ध अॅपल कंपनी हळूहळू चीनमधून आपले उत्पादन प्रकल्प दुसऱ्या देशांमध्ये नेत आहे. अॅपलशी संबंधित असलेली फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी भारतात व्यवसाय विस्तार करण्याचा विचार करत आहे. भारतात १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. फॉक्सकॉन अॅपल कंपनीसाठी आयफोनची जोडणी करण्याचे काम करते.