Former PM Manmohan Singh Dies : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं आज (२६ डिसेंबर) रोजी रात्री ९ वाजून ५१ मिनिटांनी त्यांचं निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी एक्सद्वारे मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॉ. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते. भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल. ईश्वर डॉ. मनमोहन सिंह यांच्या आत्म्यास चीरशांती देवो”, असं म्हणत शरद पवारांनी श्रद्धांजली वाहिली.

मनमोहन सिंग ३३ वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते, जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. २००४ ते २०१४ असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते.

हेही वाचा >> Dr. Manmohan Singh Passes Away : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ साली डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. चार महिन्यातच त्यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former pm manmohan singh dies at the age of 92 sharad pawar pays homage sgk