लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि बडनेराचे आमदार रवि राणा यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सिटी बॅंक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. आमदार रवि राणा यांच्या तक्रारीनंतर ईडीने अडसुळ यांना समन्स पाठवले आहे. त्यानंतर ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहचले होते. दरम्यान प्रकृती खालावल्याने आनंदराव अडसूळ यांना स्ट्रेचवरुन बाहेर आणण्यात आलं आणि नंतर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ही रवि राणा यांनी पेरलले माहिती आहे. कुठल्याही प्रकारची अटक झालेली नाही. रवि राणा यांनी इडीच्या अधिकाऱ्यांना पैशाच्या किंवा राजकीय दबावाखाली ठेवलेलं आहे. पहिल्या वेळी चौकशीसाठी बोलवल्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी जवाब नोंदवला होता कारण तक्रारदार ते स्वतः होते. या गैरव्यवहार प्रकरणी आनंद अडसूळ यांनी एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली होती. रवि राणा यांच्यावर खोट्या जातप्रमाणपत्रा प्रकरणी हायकोर्टाने ताशेरे ओढले होते. सुप्रीम कोर्टात २९ सप्टेंबर रोजी याप्रकरणी अंतिम सुनावणी होणार असल्याने आज हे समन्स बजावण्यात आलं आहे. इडीच्या जाळ्यात अडकलेला एजाज लकडावाल्याचा कोटींच्या व्यवहाराच्या नोंदी या नवनीत राणा यांनी निवडणुकीवेळी जो अर्ज भरला होता त्यामध्ये लकडावाला कडून ८६ लाख घेतल्याची नोंद केली आहे,” असे अभिजीत अडसूळ यांनी एबीपी माझासोबत बोलताना सांगितले.

“आनंदराव अडसूळ आणि त्यांच्या जावयाने सिटी कोऑपरेटिव बॅंकेला स्वतःच्या मालमत्ता भाड्याने दिल्या. त्या बॅंकेचे चेअरमन हे आनंदराव अडसूळ आहेत. बॅंकेतील खातेदारांचे पैसे अवैध पद्धतीने बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आले. त्यामुळे ही बॅंक बुडाली. यामध्ये ९८० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल होऊन दोन वर्ष झाली मात्र मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे असल्यामुळे यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर मला आज माहिती मिळाली आहे की आनंदारव अडसूळ यांना अटक झाली आहे. हळूहळू तुमच्यावरही ही वेळ येणार आहे,” असे आमदार रवि राणा यांनी म्हटले आहे.

“आनंदराव अडसूळ यांच्या घरी इडीचे अधिकारी आले असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरु असेल. ईडीचे अधिकारी इतक्या सकाळी आल्यानंतर मला वाटले की त्यांना अटक झाली असेल. कारण गंभीर गुन्हा त्यांनी केला आहे. ईडीने कारवाई केली असेल तर खातेदारांना नक्की न्याय मिळेल,” अशी प्रतिक्रिया रवि राणा यांनी दिली आहे.

“८०० कोटींचा टर्नओवर असलेल्या बॅंकेत ९८० कोटींचा घोटाळा कसा झाला. बॅंकेतील अधिकाऱ्यांनी घोटाळा केल्याचे समजल्यानंतर मी स्वतः आर्थिक घोटाळे आणि बँकिंग फसवणुकीचा तपास करणाऱ्या संस्थेकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरु आहे. यामध्ये आम्ही कोणीही सामील नाही आहोत,” असे आनंदराव अडसूळ यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former shiv sena mp anandrao adsul summoned by ed abn