सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समितीसाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी ₹१४ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, सध्याची जिल्हा परिषद बांधकाम इमारत आणि कृषी गोदामाची इमारत अजूनही ‘निर्लेखीत’ न झाल्यामुळे या कामाला विलंब होत आहे. नवीन प्रशासकीय इमारतीची गरज सावंतवाडी पंचायत समितीची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावीत यासाठी ही नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. सुरुवातीला जागेची निवड करण्यात बराच वेळ लागला, पण नंतर सालईवाडा येथील सध्याच्या जागेवरच ही इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला, कारण तिथे पुरेशी जागा उपलब्ध आहे.

आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यानंतर यासाठी ₹१४.६० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी ₹९ कोटी इमारतीच्या बांधकामासाठी आणि उर्वरित ₹५.६० लाख फर्निचर आणि इतर सुविधांसाठी आहेत.

भ्रष्टाचाराच्या आरोपांनी गाजले टेंडर:

​या इमारतीच्या कामाचे टेंडर मिळवण्यासाठी सिंधुदुर्गनगरी येथे खासगी बाऊंसर आणले गेल्याचा आरोप झाला होता. ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता. ​गेल्या आठ महिन्यांपूर्वी या कामाचे टेंडर मंजूर झाले आहे. त्यामुळे लवकरच भूमिपूजन करून कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा होती. मात्र, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि कृषी गोदामाच्या इमारती ‘निर्लेखीत’ न झाल्यामुळे काम थांबले आहे.

​या संदर्भात गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी सांगितले की, नवीन इमारत उभी राहिल्यानंतर जिल्हा परिषदेची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी येतील. सध्याच्या दोन इमारती ‘निर्लेखीत’ करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ही नवीन इमारत उभी राहिल्यानंतर कृषी, पाणी पुरवठा, लघु पाटबंधारे, महिला बालकल्याण, शिक्षण, आणि कृषी विभागासारखी अनेक कार्यालये एकाच ठिकाणी येतील. त्यामुळे नागरिकांची सोय होणार असून, लवकरात लवकर भूमिपूजन करून काम सुरू करण्याची मागणी होत आहे.