अलिबाग- मुंबई पुणे दृतगती मार्गावर प्रवाश्यांना दरोडा टाकून लुटणारी टोळी रायगड पोलीसांनी जेरबंद केली आहे. खालापूर पोलीसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून अन्य दोघा आरोपींचा शोध सरू आहे.
दिनेश बुधराम गोदरा आणि त्याचे मित्र सुरेद्र जांगु हे मुंबई पुणे दृतगती मार्गावरून पुण्याहून पनवेलच्या दिशेने जात होते. खालापूर टोलनाकाच्यापुढे ते टॉयलेट जवळ थांबले होते. यावेळी पाच चोरट्यांनी त्यांना जबरदस्तीने ओढत नेऊन त्यांना मारहाण केली. त्यांच्या पाकीटातील साडेसात हजार रुपयांची रक्कम आधारकार्ड काढून घेतले. सोबत असलेल्या सुरेंद्र यांनाही जबरदस्तीने ओढत नेऊन मारहाण केली. कोयता गळ्यावर ठेऊन त्यांच्याकडील २९ हजार रुपये काढून घेतले आणि नंतर महामार्गालगत असलेल्या झुडपात काळोखाचा फायदा घेत पळून गेले.
या घटनेनंतर दिनेश आणि सुरेंद्र यांनी पोलीसांशी तातडीने संपर्क साधला. रात्री पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, पोलीस हवालदार संदेश कावजी रात्री गस्तीवर होते. त्यांना महामार्गावर असलेल्या पोलीस शिपाई मोरे यांनी फोन करून या घटनेची माहिती दिली. पोलीसांचे पथक आणि आयआरबीचे डेल्टा फोर्सच्या पेट्रोलींग वाहन तिथे आले. डेल्टा फोर्सच्या प्रिम सावंत यांनी महामार्गावर २०० मिटर अंतरावर काही जण संशयास्पद रित्या बसून असल्याची माहिती दिली.
यानंतर सापळा लाऊन पोलीसांनी त्या ठिकाणी धाड टाकली. मात्र पोलीस आल्याचे समजताच चौघे जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले मात्र एक आरोपी पोलीसांच्या हाती लागला. त्याला अटक करून चौकशी केल्यानंतर इतर आरोपी निष्पन्न झाले. यातील तिघांना अटक करण्यात आली असून, अन्य दोघांचा शोध सुरू आहे. आरोपींकडून १५ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
अनिल अशोक पवार, मंगेश भाऊ पवार, किशोर विठठल पवार, संतोष हिलम, किशोर अशोक हिलम अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
मुंबई पुणे दृतगती मार्गावर प्रवास करताना कायदेशीर यांब्यावरच वाहने थांबवावित. थांबा नसलेल्या ठिकाणी टूक, टेम्पो, ट्रेलर इत्यादी वाहन चालकानी वाहन पार्किंग करू नये. तसेच मुंबई पुणे एक्सप्रेस रोडच्या बाजुस झाडीझुडपात संशयीत व्यक्ती लपुन बसलेले दिसल्यास आपल्या बरोबर असा कोणताही प्रसंग झाल्यास तात्काळ ११२ या क्रमाकावर फोन द्वारे पोलीसांना कळवावे असे आवाहन पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी केले आहे. या तपासात पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, पोलीस शिपाई अर्जुन मोरे, शिवाजी लौरे, पोलीस हवालदार संदेश कावजी , गृह रक्षक दल जवान गायकवाड, आय.आर.बी. डेल्टा फोर्सचे प्रविण सावंत, राजेश शिंद यांनी महत्वाची भूमिका बजावली.