सबसे कातील गौतमी पाटील अशी ओळख असणारी नृत्यांगना म्हणजे गौतमी पाटील. गौतमी पाटीलमुळे सध्या वाद वाढला आहे. गौतमीच्या कारने ३० सप्टेंबर २०२५ रोजी वडगाव बुद्रुक येथे एका रिक्षा चालकाला जोरात धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत सदर रिक्षा चालक जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, असं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं. अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढलेल्या गौतमी पाटीलच्या चालकाला काही तासांतच अटक करण्यात आली. गौतमी पाटीलला या प्रकरणात अटक करावी अशी मागणी आता रिक्षाचालकाच्या मुलीने केली आहे.

गौतमी पाटीलला अटक करा-अपर्णा मरगाळे

रिक्षाचालकाची मुलगी अपर्णा मरगाळेने तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच गौतमी पाटीलला अटक करण्याची मागणी केली आहे. अपर्णा म्हणाली, “आत्तापर्यंत आम्हाला समाधानकारक अशी उत्तरं मिळालेली नाहीत. शिवाय तपासही नीट चालला आहे असं वाटत नाही. कारण गौतमी पाटील यांची कार त्या ठिकाणाहून पंचनामा न करता कुणी उचलली? ती कार टोईंग करुन कुणी नेली? आमच्या फिर्यादींचे जबाब बदलले आहेत. ते कुणी बदलले? त्यांच्यावर काही दबाव आहे का? आम्हाला आरोपी कोण ते दाखवलं नाही. तसंच गौतमी पाटील आणि चालकाच्या कारचा सीडीआर मागवला होता. ते देखील आम्हाला मिळालेला नाही. गाडी जिथून निघाली तिथपासून अपघात होईपर्यंतचं ठिकाण इथवरचं सीसीटीव्ही फुटेज आम्ही मागितलं होतं. ते देखील आम्हाला देण्यात आलेलं नाही.” असंही अपर्णाने म्हटलं आहे.

माझे वडील चार दिवस व्हेंटिलेटरवर आहेत-अपर्णा

अपर्णा पुढे म्हणाली, “चार दिवस झाले माझे वडील व्हेंटिलेटरवर आहेत. पण कुठल्याही गोष्टीची दाहकता लक्षात न घेता पोलीस निरीक्षकांनी आम्हाला सहकार्य केलेलं नाही. आम्हाला अजून अंधारात ठेवलं आहे. त्यांच्या प्रशासनावर कुणाचा दबाव आहे की गौतमी पाटील सेलिब्रिटी असल्याने हा सगळा प्रकार होतो आहे का? सामान्य माणूस म्हणून आम्ही तुम्ही जे सांगत आहात त्यावर विश्वास ठेवू शकतो का? आज मी प्रशासनाकडे मागणी करते आहे की कुणालाही वाचवू नये. आम्हाला एक सीसीटीव्ही फुटेज देण्यात आलं त्यात गाडीचा क्रमांक, सीसीटीव्ही फुटेज काहीही दिसत नाही. फिर्यादींची साक्ष बदलली आहे. कारचा नंबर आमच्या रिक्षेला अटॅच झाला होता त्यामुळे सगळ्या गोष्टी समजल्या. गौतमी पाटील या कारमध्ये होत्या, त्यामुळे गौतमी पाटील यांना समोर आणा आणि त्यांच्यावर कारवाई करा. गौतमी पाटील यांना तुम्ही का आणत नाही? नोटीस देऊनही गौतमी पाटील का येत नाहीत? गौतमी पाटील शो कसे काय करत आहेत? माझे वडील मृत्यूशी झुंज देतो आहे तरीही गौतमी पाटील यांचे शो महत्त्वाचे आहेत का? गौतमी पाटील सहानुभूती दाखवण्यासाठी तरी आमच्यापर्यंत येतील असं वाटलं होतं. पण त्या आल्या नाहीत. गौतमी पाटील यांना अटक झाली पाहिजे. कारवाई झाली पाहिजे. ही आमची मुख्य मागणी आहे.” असंही अपर्णाने म्हटलं आहे.