सांगली : महापालिकेच्या अग्निशमन पथकाच्या सतर्कतेने गुरुवारी मिरजेच्या कृष्णा घाट येथे एका अल्पवयीन मुलीचा जीव वाचला. सावळी येथील एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या करण्याच्या इराद्याने नदीपात्रात उडी मारली. मात्र, गणेश विसर्जनासाठी तैनात असलेल्या अग्निशमन पथकाने त्या मुलीला बाहेर काढले.

मिरज अर्जुनवाड रस्त्यावर कृष्णा घाट येथील पुलावरून सावळी येथील एक अल्पवयीन मुलीने आत्महत्या करण्यासाठी कृष्णा नदी पात्रात उडी मारली. ही घटना नागरिकांच्या लक्षात आली. दरम्यान, कृष्णाघाट येथे तैनात असलेले अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्या पथकामधील रोहित निकम, विनोद मगदूम यांनी क्षणाचाही विलंब न करता बोट घेऊन त्या मुलीला नदीपात्रातून वाहून जाताना वाचविले. त्या मुलीला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठविण्यात आले.

दीड दिवसाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन होत असल्याने महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान बोटीसह बचाव कार्यासाठी कृष्णा घाटावर हजर होते. अचानक एका तरुण मुलीने पुलावरून पाण्यात उडी मारली. काही लोकांनी ही घटना पाहिली. नदीकाठी बोटीमध्ये असलेल्या अग्निशमन जवानांनी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत असलेल्या मुलीला बोटीतून पात्राबाहेर आणून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न का केला याची माहिती मिळाली नसली तरी सदर बाब महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या अंमलदारांच्या नजरेस आणून देण्यात आली आहे. या मुलीच्या नातेवाईकांशी पोलीसांनी संपर्क साधला असून त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

मुलीने दिवसा दुथडी भरून वाहणार्‍या कृष्णा नदीत उडी मारली, पूलावर यावेळी अनेक जण उपस्थित होते. काही जण मासे पकडण्यासाठी गळ टाकून पूलावर बसले होते. मात्र, कुणाच्या लक्षात येण्यापुर्वीच मुलीने उडी मारल्याने लवकर लक्षात आले नसले तरी याच दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानाच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने बोट नदीपात्रात नेउन मुलीला सुखरूप वाहत्या प्रवाहातून बाहेर काढून नदीकिनारी आणले. यामुळे एका अल्पवयीन मुलीचा जीव वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आल्याने जवानांचे कौतुक केले जात आहे.