विधिमंडळाच्या पावासाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज(सोमवार) सभागृहात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्य्यावर सत्ताधारी व विरोधक समोरा-समोर आले, एवढच नाही तर अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. यानंतर भाजपाच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आले. परिणामी भाजपाने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत, सभात्यागही केला. या सर्वच घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर, निलंबित केलेल्या भाजपाच्या सर्व १२ आमदारांनी राजभवनावर जाऊन या कारवाई विरोधात राज्यपालांना निवदेनह सादर केले. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजपा आमदारांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. लोकशाही मूल्यांची आज ठाकरे सरकारने अंत्ययात्रा काढली. भाजपाच्या आमदारांना निलंबित करण्याचं षडयंत्र सरकारने रचलं असल्याचा आरोप शेलार यांनी जाहीरपणे केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सभागृहात गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत भाजपाच्या १२ आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन

पत्रकारपरिषदेत बोलताना शेलार म्हणाले की, “आज विधानसभा सभागृहात ज्या पद्धतीने सर्व प्रकार रचला गेला, षडयंत्र केल्या गेलं आणि जे घडलंच नाही. अशा गोष्टीचं भूत उभा करून, भाजपाच्या आम्हा सगळ्या आमदारांना निलंबित करण्याचं षडयंत्र सरकारने केलं. याचं सत्य कथन आम्ही सगळ्यांनी राज्यपालांना भेटून त्यांच्यासमोर ठेवलं आहे. आम्ही राज्यपालांना विनंती केली आहे, की जे काही आरोप व ज्या आरोपांवर आमचं निलंबन केलं गेलं, त्याचा अहवाल राज्यपालांनी मागवावा, आणि त्या अहवलाला बघितल्यानंतर आमच्या निवदेनावर आणि आमच्या निलंबनावर आणि या संबंधित सर्व विषयांवर उचित कार्यावाही राज्यापालांनी करावी. राज्यपालांनी जवळपास ३५ मिनिटं आमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. काही प्रतिप्रश्न विचारून देखील सगळ्या बाजू समजून घेतल्या आणि कायदेशीर प्रक्रिया करून, उचित निर्णय़ करू अशी ग्वाही आम्हाला दिली.”

मुस्कटदाबीला आम्ही घाबरणार नाही  –

तसेच, “पुन्हा एकदा आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो, सभागृहात तर नाहीच आणि दालनात तर मुळीच नाही. भाजपाच्या कुठल्याही सदस्याने कुठलाही अपशब्द उच्चारला नाही. तरीही जी कारवाई केली ती एकतर्फा केली आहे. आम्हाला आमचं म्हणणं मांडू दिलेलं नाही. जे काही सोशल मीडियातून पसरवण्याचा प्रयत्न काही मंत्री करत आहेत, त्या व्हिडिओ क्लिप देखील कुणीही पाहिल्या तर लक्षात येईल, की त्यामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही. की ज्यामुळे तालिकेवर बसणाऱ्या सन्माननीय सदस्यांचा किंवा अध्यक्षांचा अपमर्द होईल. अशी कुठलीही गोष्ट पुराव्यानिशी सांगू शकत नाही आणि म्हणून केवळ एकतर्फा असत्य गोष्टींवर रचून लोकशाही मूल्यांची आज अंत्ययात्रा या ठाकरे सरकारने काढलेली आम्ही पाहिली आहे. या मुस्कटदाबीला आम्ही घाबरणार नाही.” असंही शेलार यांनी सांगितलं.

खोटी स्टोरी रचून भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन केलंय – फडणवीसांचा गंभीर आरोप

१२ ची संख्या पूर्ण करण्या मागचं कारण काय? हे देखील त्यांना स्पष्ट करावं लागेल  –

याचबरोबर, “ज्या ओबीसी राजकीय आरक्षणाची लढाई आम्ही लढत आहोत, त्याला अजून गती या अशाप्रकाराने असत्य पसरवण्याने मिळेल. आम्ही जनतेते आणखी गतीने जावू. १२ ही संख्या काढण्यासाठी बराच वेळ महाविकासआघाडीच्या नेत्यांनी घेतलेला दिसतोय. मी चुकत नसेल तर जवळजवळ एक तास चर्चा करून, ही १२ ची संख्या पूर्ण करण्या मागचं कारण काय? हे देखील त्यांना स्पष्ट करावं लागेल. काही सदस्य तर सभागृहात पीठासीन अधिकाऱ्याजवळही गेले नव्हते, जे निलंबित केले गेलेले आहेत आणि काहीतर त्या दालनात देखील गेले नव्हते, तरी त्यांना निलंबित केलं गेलेलं आहे. म्हणून ही एकतर्फा कारवाई, मुस्कटदाबी आहे. ही लोकशाही मूल्यांची अंत्ययात्रा ठाकरे सरकारने काढली आहे. आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. राज्यापालांसमोर सत्य कथन केल्यानंतर उचित कारवाई करण्याच्या त्यांच्या आश्वासनावर आम्ही समाधानी आहोत. असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी यावेळी बोलून दाखवलं.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government conspired to suspend bjp mla ashish shelar msr