सांगली : गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे यंदा द्राक्ष उत्पादनात २५ टक्के घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या सततच्या पावसामुळे द्राक्षकाडी पक्व होण्यात अडथळे निर्माण झाले असून याचा फळधारणेवरही परिणाम झाला आहे. याशिवाय कमी कालावधीत अतिवृष्टीची वारंवारता यंदा अनेकदा राहिल्याने द्राक्षावर रोगराईचे प्रमाणही यंदा वाढले आहे. या साऱ्यांचा परिणामस्वरूप यंदा द्राक्षाचे उत्पादन घटणार आहे. यामुळे यावर्षी उत्पादकांना द्राक्षे आंबटच लागणार आहेत.
राज्यातील सांगलीसह सोलापूर, लातूर, नाशिक या जिल्ह्यांत द्राक्षाचे मोठे उत्पादन घेण्यात येते. द्राक्षासाठी कोरडे हवामान मानवते. मात्र, या वर्षी मे महिन्याच्या १० तारखेपासून सुरू झालेला पाऊस अद्याप परतीचे नाव घेत नाही. यामुळे एप्रिल छाटणी झाल्यानंतर घड निर्मिती करणाऱ्या द्राक्ष काडीवर याचे परिणाम झाले आहेत. काडीमध्ये फळ निर्मितीची प्रक्रियाच होऊ शकलेली नाही.
काडीच्या डोळ्यामध्ये गर्भधारणा होण्यासाठी ३० ते ३५ सेल्सियस तापमानाची गरज असताना या वर्षी थांबून थांबून पडत असलेला पाऊस, पावसाळी वातावरणामुळे उष्णतेचा अभाव राहिला. यामुळे काडी तयार होण्यास लागणारे ६० ते ९० दिवसांचे कोरडे हवामान यंदा द्राक्षाला मिळू शकले नाही. एप्रिल छाटणीनंतर १० ते १२ पानावर शेंडा खुडूनही मागील तीन ते चार डोळेच गव्हाळ म्हणजेच पक्व झाले. उर्वरित काडी हिरवीच राहिली.
रोगांचाही मुक्काम
याशिवाय सततच्या आर्द्रतायुक्त हवेमुळे पानावर बुरशीजन्य दावण्या, भुरी या रोगांचाही मुक्काम कायम राहिला. परिणामी पानगळ लवकर झाली. वेलीवर अन्न निर्मितीची प्रक्रिया पानापासून सूर्यप्रकाश घेऊन केली जाते. मात्र, अपेक्षित उन्हाच्या अभावाने ही प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे होऊ शकली नाही. काडीच्या प्रारंभी असलेल्या दोन-चार डोळ्यांमधून फळछाटणीनंतर बाहेर पडणारे घड गोळी म्हणजेच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत मण्यांचे आहेत. यामुळे द्राक्ष उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने जमिनीत ओलही हटता हटत नसल्याने निमॅटोड, बुरशीजन्य रोगाच्या तडाख्यात बागा सापडल्या आहेत. एकाच रात्रीत अतिवृष्टीसारखा पाऊस पडल्याने बागांमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचून राहिले. त्याचा निचरा होण्यापूर्वी पुन्हा पाऊस पडल्याने बागेतील ओलावा कमी होऊच शकला नाही. याचा परिणाम झाडांच्या पांढऱ्या मुळांची वाढ होऊ शकली नाही. परिणामी जमिनीतील नत्र, पालाश, स्फुरद या घड निर्मितीसाठी गरजेच्या ठरणाऱ्या घटकांचा पुरवठा वेलींना होऊ शकला नाही. यामुळे उपलब्ध अन्नरसावर गोळी घड तयार झाले असावेत असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
यंदा द्राक्षवेलीसाठी आवश्यक सूर्यप्रकाश मिळू शकला नाही. सततच्या आणि जोरदार पावसाने बागांमधील पाण्याचा निचराही नीट झाला नाही. या साऱ्यांमुळे घड निर्मितीस पोषक वातावरणच तयार झाले नाही. या साऱ्यांचा परिणामस्वरूप यंदाच्या हंगामात द्राक्ष उत्पादनात २५ टक्के घट येण्याची भीती आहे. औषधाचा मारा करून रोग आटोक्यात आणण्याऐवजी बागेतील रान सुकवणे, आणि वारा खेळता राहील याची खबरदारी घेतली तर आलेला माल बुरशीजन्य रोगापासून वाचू शकेल. – विजय कुंभार, द्राक्ष तज्ज्ञ, तासगाव
चालू वर्षीच्या हंगामाला कमी वेळेत अधिक पाऊस पडल्याने द्राक्ष वेलींच्या नैसर्गिक वेळापत्रकावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. बागेतील पाण्याचा निचरा होऊ न शकल्याने बुरशीजन्य रोग आटोक्यात आणणे कठीण झाले आहे. याचबरोबर द्राक्ष काडीवरील डोळ्यांत फळधारणा होण्यासाठी आवश्यक उष्णतेच्या अभावाने उत्पादन घटणार आहे. – राजेंद्र सुंगारे, द्राक्ष उत्पादक, खंडेराजुरी ता. मिरज