महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरू असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत नंदकिशोर बालूराम शर्मा (वय- ४२) याला अटक करण्यात आली. मे. साई गुरु एन्टरप्राईज व इतर आठ कंपन्यांबाबत वस्तू व सेवाकर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरू केली होती. या संदर्भातील तपासात या सर्व बोगस कंपन्या नंदकिशोर बालूराम शर्मा नावाचा व्यक्ती चालवत असल्याचे आढळून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्यक्तीच्या अधिक चौकशीमध्ये आढळून आले की, नंदकिशोर शर्मा हा अशा प्रकारच्या २६ बोगस कंपन्या चालवतो. या कंपन्यांमार्फत आतापर्यंत २२१५ कोटी रुपयांची बोगस बिले बनविण्यात आली आहेत. या बोगस बिलांमध्ये डायमंड, कपडे, स्टील इत्यादी वस्तूंच्या बिलांचा समावेश आहे. याप्रकरणी वस्तू व सेवाकर विभागाला १२६ कोटी रुपयांची करचोरी उघड करण्यात यश आले आहे. या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर धागेदोरे आहेत का? याबाबतचा तपास सुरू आहे.

महानगर दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई सहाय्यक राज्यकर आयुक्त गणेश विलास रासकर, अविनाश ब. चव्हाण, संजय मो. शेटे व इतर सहाय्यक राज्यकर आयुक्त यांनी केली. केवळ दोन आठवड्यांच्या कालावधीत बोगस बिलांसंदर्भात एक मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना एक प्रकारे इशारा दिलेला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gst department arrest fraud businessman in for fraud bills pbs