सावंतवाडी : सैनिक परंपरा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘भोसले सैनिक स्कूल’ चे उद्घाटन होणे हा अभिमानाचा क्षण असून, या स्कूलमुळे जिल्ह्याच्या शौर्यपरंपरेला नवा आयाम प्राप्त होईल, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचालित, केंद्रीय संरक्षण मंत्रालय भारत सरकार व सैनिक स्कूल सोसायटी मान्यता प्राप्त कोकणातील पहिले ‘भोसले सैनिक स्कूल’ चे उद्घाटन ना. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले.
पालकमंत्री राणे म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला शौर्याचा व संघर्षाचा इतिहास आहे. हा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या मान्यतेने कोकणात होत असलेले हे पहिले सैनिक स्कूल म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्ण अक्षरामध्ये नोंद करण्यासारखा क्षण आहे.या स्कूलच्या माध्यमातून जिल्ह्यातून देशाचे संरक्षण करण्यासाठी अधिकारी तयार केले जातील याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.’भोसले सैनिक स्कूल’मुळे जिल्ह्याच्या शौर्यपरंपरेला नवा आयाम प्राप्त होणार आहे.
माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर
सैनिक परंपरा असलेल्या सावंतवाडी तालुक्यात ‘भोसले सैनिक स्कूल’चे उद्घाटन होणे हा अभिमानाचा क्षण आहे.
यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या या कोकणातील पहिल्या सैनिक स्कूलचे देशाच्या संरक्षणात सहभागी होणाऱ्या सैनिकांना घडविण्यात मोठे योगदान असेल.
भोसले नॉलेज सिटीचा आज वटवृक्ष होताना पाहून आनंद होत असून, स्कूल अत्याधुनिक सुविधांनी युक्त असेल.स्थानिक आमदार म्हणून संरक्षण मंत्रालयाची मान्यता असलेल्या या स्कूलचा आपल्याला अभिमान वाटतो.
उद्घाटन सोहळ्याला राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे,माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भोंसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोंसले,अध्यक्षा ॲड. अस्मिता भोंसले, सचिव संजीव देसाई,भोंसले सैनिक स्कूलचे चिफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर रत्नेश सिन्हा, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद उपाध्यक्ष ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर अभाविपचे कोकण प्रांत संघटन मंत्री निरज चौधरकर,अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद अध्यक्ष मेजर विनय देगांवकर उपस्थित होते.
भोसले नाॅलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले आणि भोंसले सैनिक स्कूलचे चिफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर रत्नेश सिन्हा यांनी स्कूल संदर्भात सर्वंकष माहिती सादर केली.
