माढा, सांगोला व पंढरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पुन्हा झोडपून काढले. याच वेळी वीज अंगावर कोसळून एका बालिकेचा मृत्यू झाला. ही दुर्घटना पंढरपूर तालुक्यातील खरसोळीत घडली. तर माढा तालुक्यातील शेवरे येथेही वीज अंगावर कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तसेच सांगोला तालुक्यातील किडबिसरी गावात वादळामुळे घरावरील पन्हाळी पत्रे उडून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा अंत झाला. काही भागात गारपीटही झाल्याचे वृत्त आहे, त्यामुळे नुकसानीचे सत्र सुरूच आहे.
सोलापूर जिल्हय़ात गेल्या फेब्रुवारीपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कहर केला असून फेब्रुवारी व मार्चमध्ये तर वादळी वारे, अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने त्यात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर गारपीट बऱ्यापैकी थांबली असली तरी अधूनमधून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपणे सुरूच आहे. पंढरपूर तालुक्यात सायंकाळनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कहर केला. त्याचा फटका काही गावांना बसला असून अनेक घरांवरील पन्हाळी पत्रे उडून गेले. खरसोळी गावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत असतानाच अचानकपणे वीज अंगावर कोसळून हेमा उत्तम जगताप (११) या बालिकेचा मृत्यू झाला. हेमा ही शेतात काम करणाऱ्या आपल्या आईसाठी जेवणाचा डबा घेऊन निघाली होती. पंढरपूर-सांगोला रस्त्यावर पंढरपूरजवळ एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली. परंतु सुदैवाने झाडाच्या आडोशाला कोणीही थांबले नव्हते. त्यामुळे कोणतीही प्राणहानी झाली नाही. सुस्ते येथे बाबासाहेब करपे यांच्या म्हशींच्या गोठय़ावर वीज कोसळून पडल्याने एक म्हैस दगावली. मगरवाडी येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाबरोबरच गारपीटही झाली. त्यामुळे उरल्यासुरल्या पिकांचे नुकसान झाले.
एरव्ही पावसाळय़ात जेमतेम पाऊस पडणाऱ्या आणि दुष्काळाचा शिक्का बसलेल्या सांगोला तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. या तालुक्यातील किडबिसरी गाावात वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. एका दुर्घटनेत रत्नाबाई श्यामराव देवकते या महिलेचा मृत्यू झाला. देवकते यांच्या घरावरील पत्रे उडाल्यानंतर लोखंडी अँगल डोक्यात पडल्याने रत्नाबाईंचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर काही भागांत विजेच्या तारा तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. घेरडी गावाच्या परिसरात अवकाळी पावसासह गारपीटही झाल्याने मोठा फटका बसला.
माढा तालुक्यातील टेंभूर्णीसह आसपासच्या गावांमध्ये अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. शेवरे गावाजवळ शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या तुकाराम रामचंद्र मस्के (३५) यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा जागीच अंत झाला. वेणेगाव, चव्हाणवाडी व अन्य भागांतही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने उच्छाद मांडला होता.