सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेती पिकाची कापणी करण्याची लगबग सुरू आहे. दरम्यान सोमवारी रात्री आणि मंगळवारी दुपारी अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात काहींना वीज कोसळण्याचा फटका बसला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवाळीच्या सणात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोमवारी रात्री ढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलखाटासह झालेल्या परतीच्या पावसाने झोडपून काढले. दोडामार्ग तालुक्यातील मणेरी धनगरवाडी येथील विठ्ठल शाम गावडे यांच्या घरावर वीज पडून मोठे नुकसान झाले आहे. वीज भिंत फोडून आरपार गेल्याने घरातील संपूर्ण वीज उपकरणे, वायर तुटून जळाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सोमवारी रात्री सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विठ्ठल शाम गावडे आणि त्यांची पत्नी विमला हे घरातील एका खोलीत बसले होते, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, वीज पडल्याने घरातील वायरिंग, बोर्ड, केबल, विद्युत उपकरणे निकामी झाली असून वीज मीटरही जळाला आहे. भिंतींना तडे गेले असून नुकसान झाले आहे.
दोडामार्ग तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने भातशेती धोक्यात आली आहे. रविवारी रात्रीही पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी नरकासुर प्रतिमांचे नुकसान झाले होते. सोमवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली आणि रात्रीच्या वेळी विजांच्या कडकडाटासह पावसाने रौद्ररूप धारण केले.
या घटनेमुळे विठ्ठल शाम गावडे यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांनी महसूल विभागाला घटनेची माहिती दिली आहे. महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावडे कुटुंबीयांकडून केली जात आहे.