अकोले : तालुक्यातील अवैध दारू व अवैध धंदे रोखण्यासाठी गावोगावी ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात येणार आहेत. तालुक्यातील एकूण १४७ पैकी ११२ ग्रामपंचायतींनी प्रांताधिकाऱ्यांच्याकडे ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी परवानगी मागणारे ठराव पाठवले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी दिली.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा रविवारी वाढदिवस आहे. अण्णा हजारे यांनीच ग्रामरक्षक दलाची कल्पना मांडली व शासनाने त्याचा शासननिर्णय केला. त्याच हजारेंच्या जिल्ह्यात अकोले तालुक्याने ११२ गावात ग्रामरक्षक दल स्थापनेचा संकल्प करून अण्णांना वाढदिवसाच्या वेगळ्या शुभेच्छा दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या पुढाकाराने अकोले तालुक्यात दारुबंदी चळवळ सुरू झाली आहे. तालुक्यातील ६२ गावांत अवैध दारू विक्री सुरू असल्याचे कार्यकर्त्यांनी आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या सरपंच व पोलीस पाटील, कार्यकर्ते, अधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठकीत निदर्शनास आणून दिले होते. या बैठकीनंतर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या धाडी अवैध दारू विक्रीवर सुरू झाल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या दारुबंदी समितीने तालुक्यात ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे गटविकास अधिकारी अमर माने यांनी सरपंचांना पत्र देऊन ग्रामरक्षक दल स्थापन करण्याबाबत ठराव देण्याचे आवाहन केले. या समितीचे अशासकीय सदस्य असणाऱ्या कुलकर्णी यांनीही ५० पेक्षा जास्त सरपंचांना फोन करून विनंती केली. सरपंच संघटनेकडूनही प्रयत्न करण्यात आले. दारुबंदी कार्यकर्त्यांनी परिसरात पाठपुरावा केला.

त्याला यश येऊन १४७ पैकी ११२ ग्रामपंचायतींनी विनंती ठराव दिले आहेत. लवकरच प्रांताधिकाऱ्यांच्या परवानगीने या गावात ग्रामरक्षक दल स्थापन केले जातील. ग्रामरक्षक दलाच्या सर्व सदस्यांना ओळखपत्र दिली जातील व त्यांना कामाची माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अकोले पोलीस निरीक्षक बोरसे यांनी दिली. ग्रामरक्षक दलामुळे तालुक्यातील अवैध दारू मटका बंद होण्यास नक्कीच मदत होईल, असा दारूबंदीसाठी आग्रही असणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे.