हिंगोली : कळमनुरी नगर परिषदेच्या ताब्यात असलेल्या सार्वजनिक हिंदू स्मशानभूमीपर्यंत पावसाळ्यात मृत व्यक्तीची अंत्ययात्रा घेऊन जातानाही नातेवाइकांसह सहभागी नागरिकांना कसरतच करावी लागत आहे. स्मशानभूमीच्या मार्गातील रस्त्यात असलेल्या ओढ्यावर पूल नसून मोठ्या पावसानंतर आलेल्या पुराचे पाणी ओसरेपर्यंत अंत्ययात्रा थांबवावी लागते किंवा तीन किलोमीटरचा फेरा मारून चालत जावे लागत असल्याची परिस्थिती आहे.

कळमनुरी शहरातील राजेंद्र शर्मा यांचे शनिवारी निधन झाले. सकाळी जोरदार पाऊस पडल्याने स्मशानभूमी मार्गातील ओढ्याला पूर आला होता. परिणामी हा रस्ताच बंद झाल्याने अंत्यविधीसाठी पार्थिव घेऊन जाताना खोळंबून राहावे लागले. ओढ्यातील पुराचे पाणी ओसरण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. काही वेळानंतर पाणी ओसरल्यावर मानवी साखळी करून एकमेकांच्या साहाय्याने गुडघ्याच्या वर, कमरेपर्यंतच्या पाण्यातून स्मशानभूमीत जावे लागले. नगर परिषदेकडे या ओढ्यावर पूल बांधण्याबाबत नागरिकांनी वारंवार मागणी केली आहे. परंतु अद्याप तरी त्यांच्या मागणीवर काही विचार समोर आलेला नाही.

हा पूल व त्यावरील समोरचा रस्ता बांधणे आवश्यक असताना नगरपरिषद प्रशासन मात्र हा प्रश्न गांभीर्यपूर्व सोडवत नाही, असा तक्रारीचा सूर अंत्ययात्रेदरम्यान उमटला. मृत राजेंद्र शर्मा यांच्या अंत्यविधीला जाताना पुराच्या पाण्यामुळे नागरिकांना पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागली. त्यात बराच वेळ गेला. पाऊस थांबल्यानंतर अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडावे लागले.

नगर परिषद प्रशासनाने ग्रामीण भागाला शहरी भागाशी जोडणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्यावर तत्काळ पूल बांधावा अन्यथा यापुढे अशी परिस्थिती उद्भवल्यास अंत्ययात्रा घेऊन सरळ नगरपरिषद कार्यालयावर आणण्यात येईल, अशा इशारावजा संतप्त प्रतिक्रिया अंत्यविधीला गेलेल्या नागरिकांनी व्यक्त केल्या.

आपण कळमनुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाचा नुकताच पदभार स्वीकारला आहे. पालिकेवर प्रशासक म्हणून तहसीलदार जीवक कांबळे आहेत. त्यांच्याकडून पुलाच्या संदर्भातील माहिती जाणून घेतली जाईल. पुलाअभावी मृताच्या अंत्यविधीसाठी अडचण येत असल्याची बाब आजच समोर आली. त्यावर आता पूल बांधण्याच्या मागणीचा विचार करू आणि मान्यता घेऊन अंदाजपत्रक तयार केले जाईल. आणि लवकरात लवकर काम सुरू केले जाईल. – रविराज दरक, मुख्याधिकारी, कळमनुरी