लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांचे नाव घोषित होत होते, तेव्हा बनसोडे गुरुजींना घरासमोरील म्हैस आणि वासराला चारा कोठून आणावा, याची चिंता होती. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले, याचा अंदाज बांधणारे बनसोडे गुरुजी मदतीसाठी कमालीचे आग्रही आहेत. काँग्रेसच्या ‘प्रायमरीज’ मतदारसंघात उमेदवार म्हणून विक्रमी मतांनी विजयी झालेल्या बनसोडे गुरुजींना उमेदवारी दिल्याचे जाहीर झाले, तेव्हा साहजिकच प्रतिक्रिया उमटली ती उमेदवार म्हणून ‘चांगला’ माणूस दिला. त्यामुळे भाजपलाही त्यांच्या तोडीचा उमेदवार देणे अनिवार्य झाले आहे.
पांढरा शर्ट, त्याच रंगाची पँट असा पेहराव असलेल्या बनसोडे गुरुजी यांचा जि. प.तील कारभारही तेवढाच ‘शुभ्र’ असल्याचे विरोधकही मान्य करतात. गारपिटीनंतर सर्वपक्षीय मंडळींना एकत्र करून भूमिका मांडणारे राज्यातील ते जि. प.चे पहिलेच अध्यक्ष.
लातूर तालुक्याच्या गंगापूर येथील दत्तात्रय बनसोडे गुरुजी शेतमजूर कुटुंबातील. एम. ए. (इंग्रजी) एम. एड्., एल.एल.बी.पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर गावातील जयकिसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ३४ वष्रे शिक्षकी पेशा केला. यातील ३० वष्रे मुख्याध्यापक होते व इंग्रजी विषय शिकवत होते. १९७५च्या सुमारास दिवंगत नेते विलासराव देशमुख लातूर पंचायत समितीचे उपसभापती होते, तेव्हा ते गंगापुरात येत. त्यांच्या सभेच्या वेळी प्रास्ताविक करणे, गावातील लोकांना एकत्र करणे, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तालुका स्तरावर पाठपुरावा करणे, अशी कामे त्यांनी केली. विलासरावांनी गुरुजींना १९९० ते ९८ या काळात लातूरच्या परीक्षा मंडळावर सदस्य म्हणून नियुक्त केले. १९९२ मध्ये झालेल्या जि. प. निवडणुकीत त्यांना िरगणात उतरवले व ते विजयी झाले. १९९५ ते २००० दरम्यान काँग्रेसचे लातूर ब्लॉकचे ते अध्यक्ष होते. २००५ मध्ये शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाल्यानंतर गावपातळीवर काम सुरू केले. गावच्या तंटामुक्त समितीचे ते अध्यक्ष होते. आपल्या कारकीर्दीत गावाला ७ लाखांचे बक्षीस त्यांनी मिळवून दिले. २०१२ मध्ये जि. प. निवडणुकीत पुन्हा िरगणात उतरवले गेले. नशिबाने त्यांना साथ दिली व जि. प.चे सर्वमान्य अध्यक्ष झाले. अध्यक्षपद मिळाल्यानंतर ते जिल्हाभर फिरले. ज्या गावात कधी लाल दिव्याची गाडी गेली नाही, त्या गावात जाऊन तेथील प्रश्न समजावून घेतले. यशवंत ग्रामसमृद्धी योजनेत लातूर जिल्हा परिषद महाराष्ट्रात पहिली आली व २५ लाखांचे पारितोषिकही जि. प.ने पटकावले.