“मी पार्थचा बाप आहे. त्याने विधानसभेला येऊ नये असं मला वाटतं. आम्ही आमच्या घरात काय करायचं ते आम्ही बघू. तुम्ही पक्षासंबंधी चर्चा करा,” असं संतापाच्या भरात अजित पवार म्हणाले. त्यानंतर मात्र पवार स्वतःच हसल्याने कार्यकर्त्यांमध्येही एकच हशा पिकला.

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर टीका केली. त्याबरोबर पार्थ पवार यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नालाही उत्तर दिले. पार्थ पवार हे लोकसभेला शहरात दिसत होते. आता मात्र विधानसभेला सक्रिय नाहीत असा त्यांना करण्यात आला होता. त्यावर संतापलेले अजित पवार म्हणाले, ही पत्रकार परिषद पवार घराण्याची चर्चा करण्यासाठी नाही. आम्ही आमच्या घरात काय करायचं ते करू. पक्षाचे अधिकृत उमेदवार, आम्ही केलेले पुरस्कृत उमेदवार, आमचा जाहिरनामा किंवा सत्ताधारी असलेल्या व्यक्तींबद्दल घेतलेली भूमिका याबद्दलची चर्चा करा,” असं पवार म्हणाले. त्यावर पार्थने लोकसभेलाच यावं आणि विधानसभेला येऊ नये यात गैर काय आहे,” असं पत्रकारांनी विचारताच अजित पवार म्हणाले,”पार्थ पवार यांनी विधानसभेला येऊ नये असं मला वाटतं. मी त्याचा बाप आहे,” असे त्यांनी सांगितलं. यानंतर स्वतः अजित पवार हसले आणि कार्यकर्त्यांमध्येही हशा पिकला.

दरम्यान, अजित पवार यांनी नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. “नाराजी दूर करण्यासाठी समोर आलो आहे. नाराज असलेल्यांना हात जोडून विनंती करणार आहे की नाराज होऊ नका. प्रशांत शितोळे यांच्यावर अन्याय झाला. मात्र त्यांना कुठेतरी संधी देईल. सामावून घेईल. सर्वच कार्यकर्ते जिवाभावाचे आहेत. सर्वच इच्छुक चांगले होते. मात्र, जागा एकच होती. यात कोणी गैरसमज करण्याचं काम नाही. राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे, राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आणि शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांना निवडून आणण्यासाठी आमची सर्व ताकद लावू,” असे म्हणत त्यांनी शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.