अलिबाग – कार्तिकी एकादशीपासून जिल्‍हयात गावोगावच्‍या देवस्‍थानच्‍या जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. आजपासून अलिबाग जवळच्‍या वरसोली येथील आंग्रेकालीन विठ्ठल मंदिराच्‍या जत्रेला सुरूवात होत आहे.पाच दिवस चालणाऱ्या या जत्रोत्‍सवाची तयारी अंतिम टप्‍प्‍यात आहे.

अलिबाग शहराला लागून असलेल्या वरसोली येथे ही व्‍युत्‍पत्‍ती एकादशीपासून सुरू होते ती पाच दिवस चालते. येथील आंग्रेकालीन मंदिराचा जिर्णोध्दार अलिकडेच करण्यात आला. वाढत्या शहरीकरणामुळे येथे दुकाने थाटण्यासाठी जागा अपुरी पडु लागली आहे. अपुऱ्या जागेतही चांगले नियोजन करुन तिथे कोणत्याही अडथळ्याशिवाय यात्रा भरवण्याचा प्रयत्न मंदिर प्रशासनाचे आहेत.

जत्रेत पाचही दिवस भाविकांची मोठी गर्दी होत असते. हे लक्षात घेवून भाविकांची कुठलीही गैरसोय होवू नये, त्‍यांना आवश्‍यक त्‍या प्राथमिक सुविधा उपलब्‍ध व्‍हाव्‍यात यासाठी यात्रा कमिटी रात्रंदिवस मेहनत करीत आहे. भाविक दुकानदारांसाठी पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. कायमस्‍वरूपी १० शौचालयांबरोबरच फिरती शौचालयेदेखील उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहेत. प्रकाश योजनेसाठी विजेची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आली असून त्‍यासाठी महवितरण कडून अतिरिक्‍त वीज जोडणी घेण्‍यात आली आहेत. सुविधा पुरवण्‍याची जबाबदारी वरसोली ग्रामपंचायतीची असते. मात्र अलिबाग नगरपालिका देखील सहकार्य करण्याची दर्शवली आहे.

वरसोलीची जत्रा म्‍हणजे बच्‍चेकंपनीसाठी पर्वणीच असते. विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, मिठाई बरोबरच खेळण्‍यांची दुकाने, नवीन इलेक्‍ट्रीक पाळणे, वेगवेगळे खेळ यांची रेचचेल असते. गृहिणींनाही घरगुती वापराच्‍या वस्‍तू खरेदी करता येतात. जत्रोत्‍सवानिमित्‍त विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. मध्‍यरात्री अडीच वाजण्‍याच्‍या सुमारास काकड आरती होईल. पहाटे अभिषेक झाल्‍यानंतर ५ वाजल्‍यापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात येईल. दिवसभर भजन, कीर्तन असे कार्यक्रम असतील. भाविकांनी याचा लाभ यावा असे आवाहन यात्रा कमिटीचे उपाध्‍यक्ष हर्षल नाईक यांनी केले आहे.