औरंगाबाद जिल्ह्यात आज 54 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता 1 हजार 173 वर पोहचली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. करोना विषाणुचा प्रादुर्भाव राज्यात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये झपाट्याने वाढली आहे व दररोज रुग्ण संख्येत अधिकच भर पडत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांमध्ये शहरातील गरम पाणी परिसर, शिवराज कॉलनी, कैलास नगर, सौदा कॉलनी, रेहमानिया कॉलनी, आझम कॉलनी, रोशन गेट, सिटी चौक, मकसूद कॉलनी, हडको एन-12, जयभीम नगर, हुसेन कॉलनी, गल्ली नं.9, खडकेश्वर, न्याय नगर, गल्ली न.18, हर्सुल कारागृह, खिवंसरा पार्क,उल्कानगरी, टाइम्स कॉलनी, कटकट गेट, मुकुंदवाडी, आदर्श कॉलनी, काबरा नगर, उस्मानपुरा, हुसेन कॉलनी, गल्ली नं.10 आणि पडेगाव येथील मीरा नगर या भागातील व्यक्ती आहेत.  या मध्ये 28 महिला व 26 पुरुषांचा समावेश आहे.

मराठवाडय़ातील करोनाबाधितांची संख्या आता वाढू लागली आहे.  सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या औरंगाबाद शहरातील सर्व रुग्ण एकमेकांच्या संपर्कातील असल्याचे दिसून आले आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात महसूल अधिकारी आणि कर्मचारी  गस्त घालत आहेत. बाहेरून सीमा सील केल्या असल्या तरी आतमध्ये नागरिक संपर्क ठेवत असल्याने प्रशासनही हैराण आहे. औरंगाबाद शहरातील करोना रुग्णांची व मृत्यूची संख्या लक्षात घेता वयोवृद्धांची तपासणी केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितलेले आहे.