चिपळूण– चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाटातील धनगर वाडीत पट्टेरी वाघाच्या दर्शनाने मोठी खळबळ उडाली आहे. येथील ग्रामस्थांना पट्टेरी वाघ दिसल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चौथ्या वाघाच्या अस्तित्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अधिकृतपणे तीन वाघ आहेत. यातील एक कोयना आणि दोन चांदोलीच्या जंगलात आहेत. चौथा वाघ चिपळूणमध्ये अधून मधून दर्शन देतो. वन विभागाने चौथ्या वाघाचे अस्तित्व मान्य केले आहे. काही महिन्यापूर्वी पोफळी धनगरवाडी आणि तळसरच्या जंगलात पठ्ठेरी वाघाने गुरांची शिकार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर शिरगावच्या जंगलात ही त्याच्या पायाचे ठसे आढळले होते. या तीन घटनेनंतर वनविभाग सतर्क झाला आणि जंगलातील पाणवठे तसेच वाटांवर कॅमेरे लावले मात्र या कॅमेरामध्ये वाघ आढळला नाही. पोफळी गावामध्ये कुंभार्ली घाटात मोठे जंगल आहे. या जंगलात पट्टेरी वाघाचा वावर असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये नेहमीच होत होती. पोफळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बबन खरात यांना रविवारी रात्री पट्टेरी वाघ शेतात वावरताना दिसला.

पोफळी धनगरवाडी परिसरात पट्टेरी वाघ आहे. रविवारी रात्री तो मला वावरताना दिसला. त्याने कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान केले नाही. येथे वाघ आहे, हे आम्हाला पूर्वीपासून माहित असल्यामुळे आम्ही काळजी घेऊन जगत आहोत. – बबन खरात, माजी ग्रामपंचायत सदस्य, पोफळी 

पोफळी धनगरवाडी परिसरात वाघाचे वास्तव्य सिद्ध झाल्याने, येथील जैविक समृद्धी आणि वन्यजीव संरक्षण यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आता स्पष्ट झाली आहे. या भागातील जंगलतोड आणि बेकायदा गौण खनिज उत्खनन  बंद होणे गरजेचे आहे.

चिपळूण तालुक्यातील जंगलामध्ये बिबट्यांची संख्या खूप आहे. पट्टेरी वाघांच्या पाऊलखुणा आढळून आले आहेत. नागरिकांनी घाबरू नये. वाघाला त्रास होईल असे कृत्य करू नये. वाघामुळे ग्रामस्थांना काही त्रास होत असेल तर त्यांनी प्रथम वन विभागाशी संपर्क साधावा. -सरवर खान, परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण