जालना – भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याने चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. जालना शहरातील यशवंतनगर भागात सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. परी दीपक गोस्वामी असे या मृत मुलीचे नाव आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात या मुलीचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून याप्रकरणी अधिक तपासही सुरू असल्याचे तालुका पोलिसांनी यासंदर्भात सांगितले.
बिहार राज्यातील दीपक गोस्वामी यशवंतनगर भागात भाड्याच्या घरात राहतात. सोमवारी पहाटे त्यांची परी ही मुलगी घराबाहेर पडली असताना तिच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून तिचे लचके तोडले. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला.
दीपक गोस्वामी यांची पत्नी सात वर्षाच्या मोठ्या मुलीसोबत गावाकडे जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर गेली होती. त्यानंतर वडिलांसह घरीच असलेली चार वर्षाची परी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडली आणि तिच्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला अशी चर्चा आहे.
तालुका जालना पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष साबळे यांनी यासंदर्भात सांगितले की, याप्रकरणी तपास चालू असून त्यानंतरच याबाबत निश्चित सांगता येईल. यासंदर्भात मृत मुलीच्या आई-वडिलांकडे विचारपूस केली आहे. परी ही मुलगी घराबाहेर कशी पडली यासंदर्भात अधिकची माहिती तपास झाल्यावरच सांगता येईल असे तालुका जालना पोलिस निरीक्षक साबळे यांनी सांगितले.
चार महिन्यातील दुसरी घटना
शिवसेना (उद्धव ठाकरे) जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी सांगितले की, शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी आपण तीन वेळेस महानगरपालिकेसमोर आंदोलने केली. परंतु असंवेदनशील प्रशासनास कांही फरक पडला नाही. यापूर्वी संजयनगर भागात एका आठ-दहा वर्षाच्या मुलावर कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात त्याच्यावर शंभरपेक्षा अधिक टाके बसले होते. परंतु सुदैवाने तो बचावला. तर शहरातील गांधीनगर भागात चार महिन्यांपूर्वी साडेतीन-चार वर्षांची मुलगी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली होती.