कराड : चाफळ विभागात पुन्हा एकदा बिबट्याचे पाळीव जनावरांवरील हल्ल्याचे सत्र सुरू झाले आहे. जाधववाडी (ता. पाटण) येथे मध्यरात्रीच्या सुमारास घराशेजारी गोठ्यात घुसून बिबट्याने हल्ला करत तीन शेळ्यांना जागीच ठार मारले तर एका शेळीस पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे ग्रामस्थात कमालीच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जाधववाडी येथील तरुण शेतकरी समीर रामचंद्र जाधव यांचे घरानजीक जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यात चार शेळ्या बांधलेल्या होत्या. नेहमीप्रमाणे जाधव यांनी गोठ्यात जनावरांना चारा व पाणी देऊन ते झोपी गेले. सकाळी उठून जाधव कुटुंबीय गोठ्यात गेले असता त्यांना चार पैकी तीन शेळ्या जागीच जखमी व मृत अवस्थेत आढळून आल्या तर एक शेळी जागेवर नसल्याचे दिसून आले. या जनावरांच्या गोठ्याच्या आसपास पाहिले असता बिबट्याच्या पायाचे ठसे तिथे आढळून आले. या प्रकारामुळे जनावरांच्या या गोठ्यातल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून चारही शेळ्यांचा गळा घोटला आणि ठार केले. तर, एक मृत शेळी फरफटत भक्ष्यासाठी सोबत नेल्याचे स्पष्ट झाले. एकंदरच प्रकार व घटना भयभीत करणारी असल्याने जाधव कुटुंबीय सध्या बिबट्याच्या दहशती खाली आहे.
तर, बिबट्याचे भरवस्तीत घुसून हल्ला करण्याचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने स्थानिकांमधून प्रचंड भीती निर्माण झाली आहे. लोक एकटे घराबाहेर पडायला धजवत नाहीत. त्यामुळे सध्या बिबटय़ाचे या लोकांना सतत सतावत आहे. वनविभागाने या घटनेचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
बिबट्याचे हल्ले वाढत असताना या गावची प्राथमिक शाळा गावाबाहेर अर्ध्या ते एक कि. मी. अंतरावर आहे. त्यामुळे लहान मुले चालतच शाळेला जात असतात. अशातच बिबट्याचा वावर वाढल्यामुळे पालक वर्ग चांगलाच घास्तावला आहे. वनविभागाने सदर विबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशीही मागणी होत आहे.