कराड : शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या स्टेशन रोडवरील कृष्णा नाका परिसरात इलेक्ट्रिक दुचाकीने अचानक घेतला पेट घेऊन ही दुचाकी आगीत खाक झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या वेळी दुचाकीस्वाराने तत्परता दाखवून दुचाकी रस्त्यात सोडल्याने त्यास कोणतीही इजा झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. मात्र, दुचाकी जळून भस्मसात झाली होती. दुचाकीतून अचानक धूर आल्याचे दुचाकीस्वाराच्या लक्षात आले. त्यानंतर तत्काळ त्याने दुचाकी रस्त्यात लावली. काही कळायच्या आत दुचाकीने मोठा पेट घेतला. भर रस्त्यात दुचाकीने पेट घेतल्याने धुराचे लोट उसळले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दुचाकीने अचानक पेट घेतल्याचे पाहून लोकांनी मोठी गर्दी केली. या वेळी रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी झाली.