अलिबाग : सुनेभाऊ येथून महाडच्या दिशेने येणारी एसटी बस शनिवारी ५० फूट दरीत कोसळली. ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. भोर महाड मार्गावर वरंध घाटात एसटीला हा अपघात झाला. वरंध गावच्या जवळ असलेल्या एका तीव्र वळणार असतांना हा अपघात झाला. बसचे ब्रेक निकामी झाल्याने, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, बस वळणावर असतांना कलंडली. रस्त्याला घासत सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुदैवाने या दुर्घटनेत जिवीत हानी झाली नाही. मात्र बस मधील १५ प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस, बचाव पथके घटना स्थळी दाखल झाली. त्यांनी बस मधील प्रवाश्यांना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी महाड येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या वरंध घाटाचे राष्ट्रीय महामार्ग पेण विभागाच्या वतीने नुकतेच काम करण्यात आले आहे. वरंध घाट ते रायगड जिल्हा हद्द या दरम्यान संरक्षक भिंत आणि रस्ता दुपदरीकरणाचे काम करण्यात आले आहे. अरुंद रस्ता आणि खोल दरी असल्याने या ठिकाणी काम करणे आव्हानात्मक ठरत असल्याने हे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी काही महिने या मार्गावरील वाहतूक बंद करून ठेवण्यात आली होती. हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली होती. धोकादायक वळणे कमी करणे, संरक्षक भिंती उभारणे या सारखी कामे करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांचा वेग मात्र वाढला आहे. मात्र यामुळे चालकांची बेपर्वाई वाढली असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In raigad district st bus falls into a valley at varandha ghat 15 passengers injured asj