रत्नागिरी : चिपळूण येथील बनावट नोटा प्रकरणाचे धागेदोरे आता रत्नागिरी पर्यंत पोहोचले आहेत. रत्नागिरीच्या प्रसाद राणे प्रिंटिंग प्रेसमधून बनावट नोटांची छपाई सुरू झाल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली. या प्रकरणातील प्रिंटिंग प्रेसचा मालक प्रसाद राणेला गुन्हे शाखेने अटक केली. या बनावट नोटांचा वापर चिपळूण नागरिक पतसंस्थेचा शाखा व्यवस्थापक अमित कासार याने पतसंस्थेच्या माध्यमातून केला आहे का? याबाबतही गुन्हे शाखा तपास करत आहे. गुन्हे शाखेने यापूर्वी शहानवाज शिरलकर (५०), राजेंद्र खेतले (४३), संदीप निवलकर (४०) आणि ऋषिकेश निवलकर (२६) यांना अटक केली होती. यांच्या चौकशीतून अमित कासारचे नाव समोर आले. कासारच्या चौकशीतून एका वकिलालाही अटक करण्यात आली आहे. या बरोबर प्रसाद राणेला रत्नागिरीतून अटक केली. रत्नागिरीमध्ये राणेची प्रिंटिंग प्रेस आहे. तेथूनच तो बनावट नोटांची छपाई करत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली.

हेही वाचा : Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे, औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत..”; देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर

गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने बनावट नोटा प्रकरणी अटकसत्र सुरू केल्यानंतर राणे याने प्रिंटिंग मशीन घरापासून काही अंतरावर असलेल्या झुडपात फेकून दिले. गुन्हे शाखेने ही मशीन जप्त केली आहे. हुबेहूब वाटणाऱ्या नोटा या नोटा तपासणाऱ्या मशीनमध्येसुद्धा ओळखल्या जात नव्हत्या. त्यामुळे आरोपींनी आतापर्यंत अनेक नोटा विविध बाजारांत चलनात आणल्याचे समोर आले. पंचवीस हजारांच्या बनावट नोटांवर दहा ते पंधरा हजारांचे कमिशन मिळत होते. यामध्ये कासार हा पतसंस्थेचा शाखा व्यवस्थापक असल्याने त्याला हाताशी घेत हे रॅकेट सुरू होते. कासारची ३१ जुलैला न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून काही उलाढाल केली आहे का? याबाबतही राणेकडे चौकशी सुरू असून त्याला ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.