सांगली : नाट्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात अत्याधुनिक ७५ नाट्यगृह उभारण्यात येणार असून नाट्यगृहातील विद्युत व्यवस्था सौरउर्जेवर करण्यात येणार असल्याचे राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी सांगितले. सांगलीत शंभराव्या नाट्य संमेलनाचा मुहुर्तमेढ सोहळा आज संपन्न झाला. यावेळी मंत्री मुनगंटीवार बोलत होते. या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, खा. संजयकाका पाटील, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ९९ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी आदी उपस्थित होते. स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी स्वागत केल्यानंतर नाट्य परिषदेच्या सांगली शाखेचे अध्यक्ष मुकुंद पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी बोलताना सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार म्हणाले, “नाटक हा उत्कृष्ट कलाप्रकार असून देशात बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतच हा कलाप्रकार अधिक चांगल्या पद्धतीने विकसित झाला आहे. नाट्य संमेलनाच्या निमित्ताने हा कला प्रकार अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचावा यासाठी चिंतन, मनन होण्याची गरज आहे. इलेक्ट्राॅनिक युगात नाट्य कला वृद्धींगत होण्यासाठी रसिक, कलावंत आणि नाटककार या तीन गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष देण्याची आवश्यकता असून यासाठी शासन मदत करण्यास सदैव तयार आहे. ज्यावेळी भाषाही विकसित झालेली नव्हती, तेव्हापासून अभिनयाद्वारे संवाद साधण्याची कला माणसाने आत्मसात केली आहे. यामुळे अभिनय क्षेत्राला मानवी विकासात महत्वाचे स्थान आहे.”

हेही वाचा : “बाळासाहेब लोकांच्या गराड्यात असायचे, भेट व्हायची नाही..”, कशी आहे प्रकाश आणि अंजली आंबेडकरांची लव्हस्टोरी?

“आज आपण सोशलकडून सेल्फिश होऊ लागलो आहोत. भावनांचा निचरा करण्यासाठी कला म्हणून नाटकाकडे पाहिले पाहिजे. नाटकाला रसिकांचा आश्रय मिळावा यासाठी ७५ नवीन नाट्यगृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही सर्व नाट्यगृहे वातानुकूलित असतील आणि यासाठी सौरउर्जेचा वापर केला जाईल. यामुळे नाट्यगृहाची भाडे आकारणी मर्यादित होऊन रसिकांनाही कमी दरात चांगली नाटके पाहता येतील”, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. यावेळी पालकमंत्री खाडे यांनी नाट्य संमेलनाच्या मुहर्तमेढ सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी नियोजन मंडळाच्या निधीतून १० लाखांचा निधी दिला जाईल असे सांगितले.

हेही वाचा : “मराठी माणसाचा दिल्ली दरबारात अपमान”, देवेंद्र फडणवीसांवरील अन्यायांची यादी वाचत सुप्रिया सुळेंचा संताप

यावेळी लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर, भाषाशास्त्राचे अभ्यासक सदानंद कदम, शाहीर देवानंद माळी यांचा सत्कार करण्यात आला. राजेंद्र पोळ यांच्या नाट्य संहिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. दरम्यान, सकाळी गिरीष चितळे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते मुहुर्तमेढीचे पूजन करण्यात आले. यानंतर हरिपूर येथे देवल कट्टा, मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह, अण्णाभाऊ साठे यांचा कर्मवीर चौकातील पुतळा, दीनानाथ नाट्यगृह, विष्णुदास भावे यांच्या आठवणी सांगणारा गणपती मंदिर परिसर आणि सांगलीवाडी येथील नाट्याचार्य खाडिलकर यांचे दत्त मंदिर येथे नाट्य संहितेचे पूजन करण्यात आले. गुरूवारी भावे नाट्यगृहात संगीतभूषण राम मराठे फांउडेशन, मराठी साहित्य संघ आणि कलाभारती यांच्यावतीने मंदारमाला या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli sudhir mungantiwar 75 theaters will be set up in state 100 th marathi natya sammelan css