तरडगाव: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण साताऱ्यातील तरडगाव चांदोबाचा लिंब येथे आज मध्यम पावसात दुपारी साडेचार वाजता अलोट उत्साहात पार पडले. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा अलौकिक सोहळा अनुभवताना लाखो वैष्णवांनी 'माऊली, माऊली' असा जयघोष करत टाळ मृदंगाच्या आवाजाने आसमंत दणाणून सोडला. हेही वाचा : पालखी सोहळ्यावर पावसाचे सावट, लाखो वारकऱ्यांच्या निवासाचा प्रश्न संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लोणंदहुन दुपारच्या जेवणानंतर पंढरीकडे निघाला. फलटण तालुक्यातील वेशीवर सरहद्द ओढा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत झाले. या प्रसंगी आ. दिपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर, कापडगाव सरपंच,'प्रांताधिकारी, तहसिलदार आदी मान्यवर उपस्थित होते. नंतर पालखी सोहळा तरडगाव मुक्कामी मार्गस्थ झाला. पहिल्या उभ्या रिंगणासाठी चांदोबाचा लिंब येथे नगारा, माऊलींचे घोडे, दिंड्या आल्या, माऊलींच्या रथापुढील २७ व १२५ दिंड्या मध्ये चोपदाराने ऊभे रिंगण लाऊन घेतले, दुपारी साडेचारला हलक्या व मध्यम पावसात धावत येणाऱ्या माऊलींच्या त्या अश्वांना पाहण्यासाठी असंख्य नजरा आतूर झाल्या होत्या. उत्साही वातावरणातच सायंकाळी साडेचार वाजता दोन्ही अश्व वैष्णवांच्या मेळ्यातून एकमेकांशी स्पर्धा करीत धावले. या दोन अश्वांनी नेत्रदीपक दौड घेत रथाकडे आले. त्यांनी रथाला प्रदक्षिणा घालत पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी अश्वांना बुक्का लावून हार घालण्यात आला, डाळ गुळाचा नैवेद्य देण्यात आला. त्यानंतर पुन्हा अश्वांनी जोरात धाव घेत उभे रिंगण पूर्ण केले. यावेळी वारकऱ्यांनी माऊलीं माऊलींच्या म्हणत जोरदार जल्लोष केला. यावेळी अश्वांच्या टापाची माती ललाटी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली. यानंतर पालखी सोहळा तरडगाव मुक्कामी मार्गस्थ झाला.