सांगली : सांगलीत माळबंगला येथे शासन व महापालिकेने बांधलेल्या अग्निशमन केंद्राकडून महापालिकेसह माधवनगर व बुधगाव या विकसित भागालाही मदत होईल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला. महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत माधवनगर रोड, माळबंगला सांगली येथे अग्निशमन केंद्राचे लोकार्पण, अग्निशमनासाठी अत्याधुनिक वाहने तसेच दीनदयाळ जन आजीविका योजनेंतर्गत महानगरपालिकेस प्राप्त ९ कचरा संकलन विद्युत वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी, उपायुक्त स्मृती पाटील, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते.
माळबंगला येथे सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आले आहे. अग्निशमन केंद्र कामांतर्गत अग्निशमन विभागाचे कार्यालय, नियंत्रण कक्ष, वर्कशॉप स्टोअर, कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थान, वाहनतळ यांचा समावेश आहे. दीनदयाळ जन आजीविका योजनेंतर्गत महानगरपालिकेस प्राप्त ९ कचरा संकलन विजेवर चालणाऱ्या वाहनांचेही लोकार्पण यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शहरामध्ये कचरा व्यवस्थापनाचे मानक सुधारण्यासाठी कचरा संकलन आणि व्यवस्थापनासाठी या इलेक्ट्रीक वाहनांचा वापर करण्यात येईल. विजेवर चालणाऱ्या कचरा संकलन वाहनावर एक वाहनचालक व सहायक अशा २ महिला घेण्यात आल्या असून एकूण १८ महिलांना काम उपलब्ध करून देण्यात आले आहे. बचत गटातील ज्या महिला कचरा संकलन करतात, त्या महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे.
तसेच विधवा, परित्यक्ता महिलांना महापालिकेच्या वतीने वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येऊन त्यांचे वाहन चालक परवान्याची पूर्तता करून घेण्यात आली आहे. या गाड्यामार्फत शहरातील कचरा संकलन करण्यात येणार आहे. या कामी उपायुक्त स्मृती पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील एकूण पाच महानगरपालिकांना अशी वाहने प्राप्त झाली असून यापैकी सांगली महापालिका एक आहे. हा उपक्रम कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल. तसेच इलेक्ट्रीक वाहनांचा देखभाल व दुरुस्ती खर्च तुलनेने कमी असतो. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी अग्निशमन केंद्राची पाहणी करून केंद्रास प्राप्त साधनसामग्रीची सविस्तर माहिती घेतली. तसेच, कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवरील महिलांशी संवाद साधला. यावेळी प्रकल्पप्रमुख ज्योती सरवदे, श्रीमती सवाखंडे, बचतगटाच्या महिला सदस्या उपस्थित होत्या.