Sanjay Raut on Team India: पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ल्यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना खेळणे योग्य नाही, असे सांगून शिवसेना (ठाकरे) पक्षाने केंद्र सरकारविरोधात आज आंदोलन छेडले आहे. तत्पूर्वी माध्यमांशी बोलत असताना आज संजय राऊत यांनी बीसीसीआय, भाजपा आणि जय शाह यांच्यावर टीका केली. भारतीय क्रिकेट संघालाही आजचा सामना खेळायचा नाही. काही क्रिकेटपटूंशी आमचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संवाद झाला असून त्यांचा या सामन्याला विरोध आहे. मात्र त्यांची अडचण असल्यामुळे त्यांना सामना खेळावा लागत असल्याचा दावा, संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत पुढे म्हणाले, “भारत-पाकिस्तान सामना व्हावा असा जय शाह यांचा दबाव आहे. क्रिकेट संघाने बीसीसीआयला हे कळवले असतानाही सामना खेळण्याची बळजबरी करण्यात येत आहे. पण दबाव झुगारून भारतीय क्रिकेट संघाने सामना न खेळता त्यांच्यात राष्ट्रभक्ती असल्याचे दाखवून द्यावे. तुम्ही मैदानात तिरंगा फडकवता ना… मग सामन्याचा निकाल काहीही लागो, तुम्ही तिरंगा फडकवू नका.”
सामन्यावर दीड लाख कोटींचा जुगार
आजच्या भारत-पाकिस्तान सामन्यावर दीड लाख कोटी रूपयांचा जुगार लावला गेला असल्याचाही दावा राऊत यांनी केला. जास्तीत जास्त जुगार गुजरातमधून आणि मुंबईतल्या काही विशिष्ट भागातून झालेले आहे. यात मोठ्या प्रमाणात भाजपाचे लोक सामील आहेत, असाही दावा त्यांनी केला.
भारतीय क्रिकेट संघ यात सामील आहे का? याचे उत्तर भारतीय संघाने द्यावे. जर उत्तर नाही असेल तर तुम्ही देशासाठी खेळत आहात की जय शाहाच्या हट्टासाठी खेळत आहात हा शिवसेनेचा प्रश्न आहे. आजचा सामना हा मनी लाँडरिंगची सर्वात मोठी केस आहे, असाही आरोप संजय राऊत यांनी केला.
पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे अनेक लोकांचे प्राण गेले. त्या जखमा अद्याप भरल्या गेलेल्या नसताना पाकिस्तानशी क्रिकेट सामना कशासाठी खेळत आहात? असा सवाल उपस्थित करत शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून आज राज्यभरात आंदोलन केले जात आहे. पाकिस्तान बरोबर होत असलेल्या क्रिकेट सामन्याला शिवसेनेचा विरोध असून ‘माझे कुंकू, माझा देश’ हे आंदोलन केले जात आहे.