राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यात ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलनं करण्यात येत असून निषेध नोंदवण्यात येत आहे. तर, दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांना धमक्याही देण्यात येत आहेत. आता आव्हाडांनी धमकी देणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मी काय चुकीचं बोललो आहे? की माझी हत्या करण्यापर्यंत तुम्ही पोहचला आहात. तुम्ही माझ्याशी वाद घाला. मी कालपासून अपमान सहन करत होतो. कोण कोणता परमहंस माझं शीर उडवण्याबद्दल बोलला. पण, मी रामभक्त आहे, त्यामुळे मला मर्यादा आहेत. मी प्रभू श्री रामाबद्दल वाईट बोललो नाही. कोणाकोणाला तुरुंगात टाकणार आहात?”
हेही वाचा : जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीरामांवरील वादग्रस्त विधानावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बदनाम हुए तो…”
“आम्ही बहुजनांचा राम मानतो”
“स्त्रीचा आदर कसा करावा, जातीभेद कशी मानू नये, हे सगळं रामायणात आहे. प्रभू श्री राम हे आदर्श आहेत. आम्ही बहुजनांचा राम मानतो. १४ वर्षे बहुजन प्रभू श्री रामाबरोबर होता. प्रभू श्री राम हे क्षत्रिय होते. आम्हीही अयोध्येला जाणार आहोत,” असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.
हेही वाचा : “जितेंद्र आव्हाडांचं ‘राम मांसाहारी होता’ हे वक्तव्य शरद पवारांच्या…”; राम कदम यांचा गंभीर आरोप
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?
राष्ट्रवादी काँग्रेस शिर्डीत शिबीर पार पडलं. तेव्हा बोलताना आव्हाडांनी म्हटलं, “प्रभू श्री राम आपले असून ते बहुजनांचा आहेत. प्रभू श्री राम शिकार करून मांसाहार करत असायचे. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र, आम्ही प्रभू श्री रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”