विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यानंतर जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला अटक झाली. जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवली होती, त्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनातून प्रतिक्रिया दिली आहे.
“माझ्या व जयंत पाटलांच्या मनामध्ये आम्हाला फसवलं गेलं अशी भावना आहे. हा सगळा प्रकार झाल्यानंतर आता जे व्हिडीओ समोर येत आहेत, त्यामध्ये संबंधित आमदारांबरोबर उभे असलेले सगळे गुंड आहेत, यांना संबंधित आमदार खुणावतो, खुणावल्यानंतर ते गुंड आतमध्ये जातात, नितीन देशमुखला मारतात. कसं मारलं ते आपण बघितलं, मारणारे किती होते, तेही आपण बघितलं,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“नंतर दोन जण पकडले जातात. त्यांना मागे बसवलं जातं. मग आम्हाला अध्यक्ष सांगतात की मी रात्री त्यांना सोडून देईन. सचिवही रात्री सांगतात ही सर्वांना सोडून देणार. अचानक मला फोन येतो की त्याला अटक केली. मी आलो, त्यांना का अटक केलं ते विचारलं. पोलीस म्हणाले की आम्हाला फक्त आदेश देण्यात आले की त्याला घेऊन स्टेशनला जा. अटक करण्याचं कारण माहीत नाही, पण आदेश असल्याने अटक केली असं त्यांनी सांगितलं. आम्ही गुंड नाही, आम्हाला संवैधानिक अधिकार आहेत. लोकशाहीमधील अधिकारांचा वापर करत आम्ही आंदोलन केलं. यावर त्यांनी गुन्हा दाखल केला, ठीक आहे त्यांनी तो करावा. पण हा जो प्रकार आहे. आमदार खुणावतो, त्यानंतर ५ जण जाऊन मारतात, हे सगळं विधानभवनात घडतं. आरोपी कोण? नावं देतो आरोपीची. पोलिसांना हवी आहेत ना नावं. घ्या..” असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी पाच नावं सांगितली.
जितेंद्र आव्हाड यांनी घेतली पाच नावे
“गणेश विठ्ठल भुते, हा एक गुन्हेगार आहे. (हिंगेवाडी, आटपाडी) दुसरा ऋषिकेश टकले त्याच्याबरोबर असलेले महादेव पाटील, (वनपुरी, आटपाडी) कृष्णा रासकर आणि लक्ष्मण जगदौंड हे पाच जण मारायला असताना तुम्ही फक्त एकालाच अटक केली. दोघांना ताब्यात घेतलं आणि शेवटी पोलीस स्टेशनला फक्त एकच जण गेला. दुसरा कुठे गेला? हे प्रश्न पोलिसांना विचारल्यावर माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला. माझं आयुष्य या आंदोलनातच गेलंय, गुन्हा दाखल झाल्याने मला फार धक्का बसला वगैरे काही झालेलं नाही. पण इतकं खोटं काम विधानसभेत होतं, अध्यक्ष शब्द देतात पण शब्द पाळत नाहीत याचं दुःख मात्र आम्हाला आहे, असं जितेंद्र आव्हाड या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देत म्हणाले.