Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिराला भेट दिली. यानंतर त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा गाभारा पाडण्याच्या बेतात राज्य सरकार आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच काहीही झालं तरीही तुळजाभवानी मंदिरातील गाभारा पाडू देणार नाही असंही आव्हाड म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाड मंगळवारी तुळजापूरमध्ये होते, त्यांनी देवीचं दर्शनही घेतलं

जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी आई तुळजाभवानी मंदिरात उपस्थिती दर्शवत तुळजाभवानीचे दर्शन घेतलं. मंदिर संस्थानकडून सुरू असलेल्या गाभारा दुरुस्ती आणि विकास कामाची पाहणी केली. मंदिर संस्थान करत असलेल्या इतर विकास कामाला माझा विरोध नसून देवीच्या गाभाऱ्याची गरज नसताना मोडतोड का केली जाते? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. तसंच, ‘मी सनातन हिंदू नसलो, तरी हिंदू असून देवीचा मंदिराच्या दगडाला लावून देणार’ नसल्याची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी घेतली.

जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट काय?

तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा गाभारा पाडण्याच्या बेतात हे राज्य सरकार आहे.हा आमच्या संस्कृतीवर आणि आमच्या श्रद्धेवर घाला आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर,नुसते मंदिर नसून लाखो करोडो भक्तांच्या आस्थेचे प्रतीक आहे. याविरोधात तुळजापूर येथे मंदिराला भेट देऊन भाविकांच्या याबाबत जनजागृती केली….सोबतच आई तुळजाभवानी मातेचे दर्शन देखील घेतले.

जितेंद्र आव्हाड यांनी मंदिरात येत पाहणी केली यावेळी मात्र भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड आक्रमक होत गोंधळ घातला. जितेंद्र आव्हाड मंदिरात असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली.

जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलं आहे?

माझा विकासाला कधीच विरोध नाही. मात्र ऐतिहासिक संदर्भ असलेले दगड म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आहे. ज्या दगडांनी शिवाजी महाराजांना पाहिलं आहे, ज्या दगडांनी अहिल्याबाई होळकरांना पाहिलं. त्या दगडांना हलवणारे हे कोण लागून गेले? ज्या दरवाजांतून शिवाजी महाराज आले, ज्या पायऱ्यांवरु ते खाली उतरले, वरती आले त्या पायऱ्या तोडून टाकायच्या? उद्या म्हणतील रायगड तोडा, तिथे नवा रायगड उभारा नाही चालणार असं, कारण आमची श्रद्धा आहे तिथे. तुम्ही काहीही करा. पण देवीच्या गाभाऱ्याला हात लावायचा नाही. गाभाऱ्याला ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ आहे. मंदिरातल्या गाभाऱ्याला हात लावायचा नाही. बाहेरुन जे काही सुशोभीकरण करायचं ते करा. मात्र गाभाऱ्याला हात लावू देणार नाही. ही माझी भूमिका आहे असं आव्हाड म्हणाले.

भाजपा कार्यकर्त्यांनी काय म्हटलं आहे?

जितेंद्र आव्हाड फक्त प्रसिद्धीचा स्टंट करत आहेत. प्रभू रामचंद्र मांसाहारी होते असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. तसंच सनातन हिंदू धर्मावर त्यांनी टीका केली आहे. आतापर्यंत सनातन धर्म नाही, नीच दर्जा आहे वगैरे आहे असं म्हणाले आहेत. आज ते म्हणत आहेत मी हिंदू आहे हे सांगायची वेळ आव्हाडांवर का आली ? त्या नास्तिक माणसाला काहीही कळवळा नाही. फक्त प्रसिद्धीचा स्टंट आहे. आव्हाड राजकीय षडयंत्र करत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात बसून तुळजा भवानीची तलवार चोरीला केली असं बेताल वक्तव्य केलं. काहीही आरोप कुठलीही माहिती न घेता ते करत आहेत. मंदिर उद्ध्वस्त करणार आहे असं आव्हाड म्हणत आहेत ही त्यांची पोटदुखी आहे. आम्ही त्यांचा जितेंद्र आव्हाड यांचा धिक्कार करतो अशी भूमिका भाजपा कार्यकर्त्यांनी घेतली आहे.