शरद पवार यांना सोडून अजित पवारांनी महायुतीत प्रवेश केला. २ जुलै २०२३ ही ती तारीख होती. त्या दिवसापासून जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांच्यातून विस्तव जात नाही. दोघांमध्ये आधीही मतभेद होतेच, मात्र अजित पवार वेगळे झाल्यापासून या दोघांमधलं हाडवैर कायमच समोर आलं आहे. अशात आता जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी अजित पवारांना खोचक सल्ला दिला आहे.

शरद पवारांच्या मनात वेगळं काहीही नाही

शरद पवार हे चाळीस ते पन्नास वर्षे महाराष्ट्रातल्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या मनात काहीतरी वेगळं आहे, त्यांच्या उजव्या हाताला कळत नाही डाव्या हाताचं काय म्हणणं आहे. असं आव्हाड म्हणाले. हल्ली खोटे नरेटिव्ह कोण सेट करतं आहे? आमच्या तिघांमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, सोनिया गांधी हे निर्णय घेतील. लाडकी बहीण मुख्यमंत्री, लाडकी बहीण उपमुख्यमंत्री असं नाही. असा टोलाही आव्हाड यांनी लगावला. तसंच आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं बघावं वाकून हे चाललं आहे. त्याला काही अर्थ नाही असंही जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) म्हणाले. शरद पवारांच्या मनात वेगळा मुख्यमंत्री वगैरे काही नाही. असंही आव्हाड ( Jitendra Awhad ) म्हणाले.

हे पण वाचा- एक छावणी लुटण्याइतके शिवाजी महाराज छोटे नव्हते, जितेंद्र आव्हाड यांचे फडणवीस यांना प्रत्युत्तर

महायुतीला लोकांनी जागा दाखवली

महायुतीने सांगितलं होतं की आम्ही लोकसभेला ४५ जागा जिंकणार आहोत. नंतर ते ४२ आणि ४१ वर आले, त्यानंतर ४० जागांवर आले शेवटी निकालाच्या दिवशी काय झालं ते तुम्हाला माहीत आहे. असं जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) म्हणाले. भाजपावर त्यांनी टीका केली. तसंच नंतर त्यांना जेव्हा अजित पवारांबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी खोचक सल्ला दिला.

जितेंद्र आव्हाड अजित पवारांबाबत काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड यांना दादांचा वादा याबाबत विचारलं असता ते म्हणाले, “काकांना घराबाहेर हाकला, पक्ष फोडा, पक्षचिन्ह पळवा हाच त्यांचा वादा आहे. महाराष्ट्राच्या संस्कृती आणि संस्काराला काळीमा फासणारा वादा आहे त्यांचा. त्यांनी शेवटी कबूलच केलं ना? मी चूक केली म्हणून. जी मोठी चूक आहे. काँग्रेसला सोडून खूप कमी लोक राजकीयदृष्ट्या जिवंत राहिले आहेत त्यापैकी एक शरद पवार आहेत. १९९९ ला शरद पवारांनी आपला पक्ष स्थापन केला. तो देशभरात नेला, त्याचं नाव आणि चिन्ह देशभरात नेलं तो एका दिवसात तुम्ही (अजित पवार) चोरुन मोकळे झाले. घर फोडलं वाईट वाटतंय, बहिणीविरोधात उमेदवार दिला वाईट वाटतंय असं आता सांगताय. शरद पवारांना सर्वात वाईट काय वाटतं ? पक्ष आणि चिन्ह चोरुन नेला याचं त्यांना जास्त वाईट वाटतं. आज त्यांच्याइतका राजकारणात इतका व्यग्र असलेला माणूस कुणीही नाही. त्यांच्या मनाला किती यातना झाल्या असतील? लोकांनी तुम्हाला धडा शिकवला. आता एवढं जर कबूल करत आहात की पश्चात्ताप होतो आहे तर मग शरद पवारांना त्यांचा पक्ष आणि चिन्ह देऊन टाका. दादाचा वादा पाळा आणि चिन्ह परत देऊन टाका. असं घडलं तर भारताच्या राजकारणात असं उदाहरण नसेल. दानशूर दादा असं गाणं मी स्वतः लिहून देईन” असा टोला आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी अजित पवारांना लगावला.