कराड : केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने सर्व शिक्षा अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, नगरपालिका, सर्वअनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक व खासगी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी मोफत पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे यांनी दिली.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याच्या योजनेचा कराडमध्ये शुभारंभ करण्यात आला, त्यात मोरे बोलत होते. मोरे म्हणाले, यंदाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी कराड तालुक्यातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ४३ हजार २५१ पाठ्यपुस्तकांचे संच प्राप्त झाले असून, त्याचे केंद्रस्तरावर वितरण सुरू करण्यात आले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, यासाठी योग्य नियोजन करण्यात आल्याचे मोरे यांनी सांगितले.

सध्या तालुक्यातील २४ केंद्रांमध्ये या पुस्तकांचे वितरण सुरू असून, शाळा सुरू होण्यापूर्वीच पुस्तक संच शाळास्तरावर पोहोचवली जात आहेत. यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना ही पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाला जमिला मुलाणी, निवास पवार, शालेय पोषण आहार अधीक्षक विजय परीट यांच्यासह केंद्रप्रमुख, केंद्र समन्वयक, गट साधन केंद्र कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते.

इयत्तावार पाठ्यपुस्तक संच

इयत्ता पहिली ४,९२८ संच, दुसरी ४,९२८, तिसरी ४,९२८, चौथी ५,४०२, पाचवी ५,६३०, सहावी ५,४५९, सातवी ५,७७१, आठवी ६,२०५ असे एकूण ४३,२५१ पाठ्यपुस्तक संच विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहेत.