कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीण नांदणीमधून नेल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र भावना व्यक्त होत असताना आता लोकप्रतिनिधींनी याबाबतच्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील धनंजय महाडिक, धैर्यशील माने यांनी नवी दिल्लीत आवाज उठवला आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

हत्तीण पुन्हा आणू – महाडिक

जनभावनेचा विचार करून महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठाकडे सुपूर्द करावी, अशी विनंती खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन करत त्यांचे या विषयाकडे लक्ष वेधले.

आत्म्यावर घाला – माने

महादेवी हत्तीण प्रकरण आमच्या आत्म्यावर घाला आहे, असा उल्लेख करून खासदार धैर्यशील माने यांनी एका चित्रफितीद्वारे या विषयावर संसदेत आवाज उठवणार असल्याची ग्वाही दिली आहे.

स्वाक्षरी मोहीम – बंटी पाटील

लाडक्या महादेवीला परत आपल्या घरी आणण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील तब्बल सव्वा लाखाहून अधिक नागरिकांनी क्युआर कोडद्वारे सहभाग घेतला. आमदार पाटील यांनी नांदणी मठात जाऊन जिनसेन स्वस्तिश्री भट्टारक यांची भेट घेतली. महादेवीला परत आणण्यासाठी लाखो सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींकडे पाठवणार असल्याचे सांगितले.

आत्मक्लेश पदयात्रा – शेट्टी

या विषयाला वाचा फोडण्यासाठी नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेश पदयात्रा काढली जाणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी, महादेवीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी या पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

दुर्दैवी निर्णय – कोरे

महादेवी हत्तीण वनतारा पशुसंग्रहालयाला पाठवण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. यापुढे अशा बाबतीत लोकभावनेचा आदर झाला पाहिजे. यासाठी आपण केंद्र सरकार व राज्य शासनाकडे प्रयत्न करणार असल्याचे आमदार विनय कोरे यांनी सांगितले.